नवी दिल्ली,
Vaibhav's entry into Team India भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिका भारतीय संघाने ३-० अशी जिंकली असली, तरी १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला तिन्ही सामन्यांत अंतिम अकरामध्ये स्थान मिळाले नाही. वैभवची आक्रमक फलंदाजी पाहण्यासाठी मोठ्या संख्येने चाहते मैदानावर येत असताना त्याला संपूर्ण मालिकेत बाहेर बसावे लागले. आता भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी वैभवला संघात संधी मिळण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते, असे स्पष्ट केले आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या तिन्ही सामन्यांत संजू सॅमसनने सलामीची जबाबदारी सांभाळली. मिळालेल्या संधीचा फायदा उठवत सॅमसनने तीन डावांत दोन अर्धशतके झळकावली. त्याने मालिकेत १०, ५७ आणि ५० धावांच्या खेळी केल्या. त्यामुळे सलामीच्या जागेसाठी वैभवला सध्या स्पर्धेत असूनही अंतिम अकरामध्ये स्थान मिळवण्यासाठी आणखी वाट पाहावी लागू शकते. तिसऱ्या टी-२० सामन्यानंतर पत्रकार परिषदेत गौतम गंभीर यांनी वैभवशी त्याच्या संधीबाबत स्पष्ट चर्चा झाल्याचे सांगितले.

गंभीर यांच्या मते, वैभवमध्ये प्रचंड गुणवत्ता असून तो भविष्यात काय करू शकतो, याची संघ व्यवस्थापनाला पूर्ण कल्पना आहे. मात्र गेल्या २-३ वर्षांपासून सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला नव्याने संघात दाखल झालेल्या खेळाडूपेक्षा प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. खेळाडूचे वय १५ वर्षे असो किंवा ३० वर्षे, प्रत्येकाला आपल्या संधीची प्रतीक्षा करावी लागते, असा संदेशही गंभीर यांनी दिला. वैभवच्या कारकिर्दीबाबत गंभीर आशावादी आहेत. योग्य वेळी संधी मिळाल्यानंतर वैभव दीर्घकाळ भारतीय संघाचा भाग राहू शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे. भारतीय क्रिकेटमध्ये संघातील स्थानासाठी चांगली स्पर्धा आणि गुणवत्ता असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, वैभवने आतापर्यंत ६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १९३ धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या ८१ असून, त्याने आतापर्यंत २ अर्धशतके झळकावली आहेत.