सीएनजी सिलिंडरच्या ट्रकला आग

सुदैवाने अनर्थ टळला

    दिनांक :18-Sep-2026
Total Views |
वाशीम,
washim cng cylinder कारंजा येथून वाशीमकडे सीएनजी सिलिंडर घेऊन जाणार्‍या ट्रकला गुरुवारी रात्री अचानक आग लागल्याची घटना कासोळा फाटा ते बिटोडा भोयर दरम्यान घडली. स्थानिक नागरिक आणि अग्नीशमन दलाने वेळीच आग विझविल्याने संभाव्य अनर्थ टळला.
 
 

सुदैवाने अनर्थ टळला
प्राप्त माहितीनुसार, एमएच २७ डीटी ९८९८ क्रमांकाचा सीएनजी सिलिंडर वाहतूक करणारा ट्रक गुरुवारी, १७ सप्टेंबर रोजी रात्री कारंजा येथून वाशीमकडे निघाला होता. कासोळा फाटा ओलांडल्यानंतर बिटोडा भोयर पासून काही अंतरावर ट्रकला अचानक आग लागली. ट्रकला आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. ही माहिती मिळताच आसेगाव पोलिसांनी तातडीन अग्नीशमन दलास पाचारण केले. स्थानिक नागरिक आणि अग्नीशमन दलाच्या मदतीने तातडीने आग विझविण्यात आली. त्यामुळे सीएनजी सिलिंडर असलेल्या ट्रकला लागलेल्या आगीमुळे होणारा संभाव्य धोका टळला. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
ट्रकला आकस्मात लागलेल्या आगीने दोन्हीकडील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. आगीमुळे ट्रकमधील सिलेंडरचा स्फोट होवून आगीचा भडका उडाला. स्फोटाचा आवाज ऐकून लगतच्या गावातील लोक घटनास्थळी धावले. तसेच आसेगाव पोस्टे चे अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. ट्रकला नेमकी आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होवू शकले नाही.
.................