कारंजा लाड,
washim farmer suicide दीड महिन्यापासून पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके हातातून जाण्याची भीती, शेतीवरील वाढते संकट आणि डोयावर असलेले कर्ज फेडण्याची विवंचना यामुळे ४२ वर्षीय शेतकरी योगेश मोतीराम अवघड यांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना कारंजा तालुयातील लाडेगाव येथे घडली. त्यांच्या मृत्यूमुळे पत्नी आणि दोन मुलांवर मोठे संकट कोसळले आहे.
योगेश अवघड यांच्याकडे लाडेगाव येथे सुमारे आठ एकर शेती असून भारतीय स्टेट बँक, कामरगाव शाखेचे त्यांच्यावर पीक कर्ज असल्याची प्राथमिक माहिती सूत्राद्वारे प्राप्त झाली आहे. यंदाच्या खरीप हंगामात पावसाने प्रदीर्घ खंड दिल्याने पिकांची अवस्था बिकट झाली होती. उभ्या पिकांना पाण्याची गरज असताना पाऊस गायब झाल्याने उत्पादन हातचे जाण्याची चिंता शेतकर्यांना सतावत होती. त्यातच शेतीचा खर्च, कर्जाची परतफेड आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह यामुळे योगेश अवघड हे आर्थिक विवंचनेत होते, अशी माहिती समोर आली आहे. १७ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे ३ वाजता लाडेगाव येथील राहत्या घरी त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केले. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना तातडीने कामरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथून त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले.अमरावती येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना १८ सप्टेंबर रोजी सकाळी ३ वाजताच्या सुमारास योगेश अवघड यांची प्राणज्योत मालवली. या घटनेने लाडेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, एका कुटुंबाचा आधार अचानक हिरावला गेला आहे. योगेश अवघड यांच्या आत्महत्येमुळे पावसाचा खंड, पिकांचे नुकसान आणि कर्जबाजारीपणा या प्रश्नांनी पुन्हा एकदा गंभीर स्वरूप धारण केले आहे. दरम्यान कामरगाव ग्रामीण रुग्णालयात योग्य वेळी उपचार मिळाले नाहीत, असा गंभीर आरोप मृत शेतकर्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.
विष बाहेर काढण्यासाठी रुग्णाने नळी टाकण्यास प्रतिसाद दिला नाही
सदर रुग्णाने विषप्राशन केल्यानंतर कामरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकार्यांनी शरीरातील विष बाहेर काढण्यासाठी तीन वेळा नळी टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु रुग्णांने प्रतिसाद दिला नाही तसेच विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी रुग्णाला आवश्यक ते प्राथमिक उपचार करण्यात आले. परंतु शरीरात विष अधिक प्रमाणात भिनले असल्याने त्यांना अमरावती येथे रेफर करण्यात आले.
डॉ.भाऊसाहेब लहाने, वैद्यकीय अधीक्षक