दर्शनासाठी आला...देवाच्या दारीच सोडला जीव

    दिनांक :19-Sep-2026
Total Views |
मुंबई
lalbaugcha raja गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले असताना मुंबईतील गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक मुंबईत दाखल होत आहेत. मात्र, याच दर्शनासाठी जळगावहून मुंबईत आलेल्या एका २५ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
 

25-year-old jalgaon youth dies of heart attack while waiting for lalbaugcha raja darshan in mumbai 
जयदीप मेघराज नेमाडे असे मृत तरुणाचे नाव आहे. तो जळगाव येथील रहिवासी असून ट्रान्सपोर्ट व्यवसायाशी संबंधित होता. गणेशोत्सवाच्या काळात लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी तो मुंबईत आला होता. गुरुवारी रात्री दर्शनाच्या रांगेत उभा असताना त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्याची प्रकृती झपाट्याने खालावली.
घटनेची माहिती मिळताच मंदिरातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जयदीपला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच उशीर झाला होता. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जयदीपच्या निधनाची माहिती कुटुंबीयांना मिळताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. बाप्पाच्या दर्शनासाठी आनंदाने मुंबईत आलेला जयदीप पुन्हा जळगावला परतलाच नाही, या घटनेने कुटुंबीयांसह परिचितांनाही मोठा धक्का बसला आहे.दरम्यान, गणेशोत्सवात लालबागच्या राजाच्या lalbaugcha raja दर्शनासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक मुंबईत येतात. मुंबईसह पुणे, सातारा, सांगली तसेच राज्याच्या विविध भागांतून भाविक दर्शनासाठी दाखल होत असतात. दर्शनासाठी अनेकदा तासन्तास लांब रांगेत उभे राहावे लागते. भाविकांची ही मोठी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाकडून विविध नियोजन केले जाते. मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्तही तैनात केला जातो.
गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवसापर्यंत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी कायम असते. दर्शनासोबतच विसर्जनाच्या वेळीही मोठ्या संख्येने नागरिक मुंबईत उपस्थित राहतात. गर्दीचे विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. अशा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात जयदीपच्या मृत्यूची घटना घडल्याने भाविकांमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे.