अमित शाह यांचा कोल्हापूर दौरा अचानक रद्द

    दिनांक :19-Sep-2026
Total Views |
कोल्हापूर
amit shah केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा नियोजित दोन दिवसांचा कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्र दौरा ऐनवेळी रद्द झाला आहे. शनिवारी कर्नाटकातील हुबळी येथे असताना अचानक प्रकृती अस्वस्थ झाल्याने डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला. त्यानंतर शाह यांनी हुबळी विमानतळावरून थेट दिल्लीकडे प्रयाण केले. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरासह हुपरी परिसरात प्रशासन आणि महायुतीच्या स्थानिक नेत्यांकडून मोठी तयारी करण्यात आली होती. स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या कमानी, फलक तसेच सुरक्षेची करण्यात आलेली व्यवस्था दौरा रद्द झाल्यानंतर हटविण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली.
 

amit shah kolhapur visit cancelled; rs 600 crore green energy project bhoomipujan likely in presence of devendra fadnavis 
शाह यांच्या या दौऱ्यात हुपरी येथील कल्लाप्पाणा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना परिसरात प्रस्तावित ‘महालक्ष्मी ग्रीन एनर्जी’ प्रकल्पाची पायाभरणी होणार होती. ‘वेस्ट टू बेस्ट’ या संकल्पनेवर आधारित हा प्रकल्प पर्यावरणपूरक तसेच शून्य कचरा तत्त्वावर उभारला जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून कचऱ्याचा पर्यावरणपूरक पद्धतीने वापर करून हरित ऊर्जानिर्मितीला चालना देण्याचे नियोजन आहे.
दरम्यान, शाह यांच्या दौऱ्यात शेजारील कर्नाटकातील चिक्कोडी तालुक्यातील एकसंबा येथे विविध नागरी विकासकामांचे लोकार्पणही नियोजित करण्यात आले होते. या संपूर्ण कार्यक्रमासाठी स्थानिक आमदार राहुल आवाडे तसेच कारखाना व्यवस्थापनाने मोठ्या प्रमाणावर नियोजन केले होते. शाह यांच्या स्वागतासाठी आणि कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रशासनाकडूनही आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली होती.
मात्र, गृहमंत्र्यांचा दौरा अचानक रद्द झाल्याने नियोजित कार्यक्रमांच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हुपरी येथील ६०० कोटी रुपयांच्या महत्त्वपूर्ण हरित ऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे संकेत आहेत. नियोजित वेळेत कार्यक्रम पार पाडण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि आयोजकांकडून नव्या रूपरेषेची तयारी केली जात आहे. यासंदर्भातील अधिकृत घोषणा तसेच सुधारित कार्यक्रमाचे वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.