जिल्ह्यात ‘बाप्पा डॉट’ला ‘शून्य’ प्रतिसाद

    दिनांक :19-Sep-2026
Total Views |
वर्धा, 
Bappa Dot receives 'zero response गणेशोत्सवाच्या बहुआयामी सांस्कृतिक परंपरेत मूर्तिकार, लोककलावंत तसेच विविध पारंपरिक कलांशी संबंधित कारागिरांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. या कलापरंपरांचे कायमस्वरूपी डिजिटल दस्तऐवजीकरण करून त्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणे, आध्यात्मिक पर्यटनाला चालना देणे तसेच महाराष्ट्राच्या एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टाला गती देणे या हेतूने ‘बाप्पा डॉट’ हा उपक्रम मागील वर्षीपासून राज्य शासनाने हाती घेतला. मात्र, यंदा या उपक्रमाला जिल्ह्यात शून्य प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे, मागील वर्षी एका सार्वजनिक मंडळाने नोंदणी केली होती. त्या मंडळाला पुरस्काराने गौरविण्यातही आले होते.
 
 
Bappa Dot receives
 
 
‘बाप्पा डॉट’ या राज्याच्या महत्त्वाकांशी उपक्रमाचा युनेस्कोशीही संबंध आहे. गणेशोत्सवाच्या समृद्ध परंपरांचे डिजिटल दस्तऐवजीकरण करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने ‘बाप्पा डॉट ओआरजी’ हा अभिनव डिजिटल उपक्रम सुरू केला. याव्दारे युनेस्कोचा अमूर्त जागतिक सांस्कृतिक वारसा दर्जा गणेशोत्सवाला मिळवून देण्यासाठी याव्दारे प्रयत्न करण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला असला तरी या माध्यमातून कला, संस्कृती, ज्ञान, परंपरा आणि उद्योजकतेला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. पुरातत्त्व संचालनालयामार्फत विकसित करण्यात आलेल्या अधिकृत पोर्टलद्वारे महाराष्ट्रासह देशभरातील तसेच जगातील ३५ हून अधिक शहरांमधील नागरिकांना आपल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची छायाचित्रे, व्हिडिओ, सजावट, धार्मिक विधी, ऐतिहासिक आठवणी, पारंपरिक खाद्यसंस्कृती आदींची माहिती ऑनलाइन माध्यमातून नोंदविता येणार आहे. पण, यंदा जिल्ह्यातील एकाही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने या उपक्रमात सहभागी होण्यासाठी साधी नोंदणी केली नसल्याचे सांगण्यात आले. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात ‘बाप्पा डॉट ओआरजी’ हा अभिनव डिजिटल उपक्रम राबविला जात आहे. मात्र, आतापर्यंत जिल्ह्यातील एकाही सार्वजनिक गणेश मंडळाने या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी केली नसल्याची प्रतिक्रीया नोडल अधिकारी ज्ञानेश्वर खडतकर यांनी दिली.