सांगलीच्या पटवर्धन संस्थानच्या गणपतीवरून वाद

भाग्यश्रींची विसर्जन मिरवणुकीकडेही पाठ

    दिनांक :19-Sep-2026
Total Views |
सांगली
bhagyashree सांगलीच्या पटवर्धन संस्थानच्या गणपती पूजेच्या अधिकारावरून निर्माण झालेला वारसदाराचा वाद आता विसर्जन मिरवणुकीपर्यंत पोहोचला आहे. गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत अभिनेत्री भाग्यश्री उपस्थित राहणार असल्याची चर्चा होती. मात्र, पूजेवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विसर्जन मिरवणुकीलाही अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून आले. दरम्यान, संस्थानचे राजे विजयसिंह पटवर्धन आणि राणी राजलक्ष्मी विसर्जनावेळी उपस्थित होते. सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या उपस्थितीत गणपतीची आरती करण्यात आली.
 

bhagyashree absent from sangli ganpati visarjan amid patwardhan family dispute 
यंदाच्या गणेशोत्सवात भाग्यश्री पटवर्धन यांच्या संस्थानच्या गणपती मंदिरातील पूजेवरून हा वाद उफाळून आला. तब्बल चार वर्षांनंतर अभिनेत्री भाग्यश्री सांगलीतील संस्थानच्या गणेशोत्सवासाठी आल्या होत्या. त्यांनी संस्थानच्या मालकीच्या गणपतीची पूजाही केली. मात्र, त्यांच्या या पूजेला स्वतः त्यांच्या आई-वडिलांनीच विरोध केला. या प्रसंगाचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले. विशेष म्हणजे, स्वतः वडील विरोध करताना दिसत असल्याने या प्रकरणाची चर्चा अधिक रंगली.
 
भाग्यश्री या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटामुळे प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री असून त्या पटवर्धन संस्थानचे राजे विजयसिंह पटवर्धन यांच्या कन्या आहेत. विजयसिंहराजे आणि राणी राजलक्ष्मी यांना तीन कन्या असून त्यांना मुलगा नाही. दरम्यान, २०२४ मध्ये राजे विजयसिंह पटवर्धन यांनी आदित्यराजे पटवर्धन यांना दत्तक घेतले आणि त्यांना संस्थानचा पुढील वारसदार म्हणून घोषित केले. यंदाच्या गणपती पूजेचा मान आदित्यराजे यांच्याकडे असल्याचे विजयसिंहराजे यांनी स्पष्ट केले.
 
पूजेच्या अधिकारावरून निर्माण झालेल्या वादाच्या केंद्रस्थानी मंदिरातील धार्मिक विधींमध्ये कोणाला प्रवेश आणि पूजेचा अधिकार आहे, हा मुद्दा आहे. विजयसिंहराजे यांच्या म्हणण्यानुसार, केवळ पटवर्धन कुटुंबातील आणि चित्पावन ब्राह्मण कोकणस्थ व्यक्तीलाच मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्याचा अधिकार आहे. त्यामुळे दत्तकपुत्र आदित्यराजे यांनाच यंदाच्या पूजेचा मान देण्यात आला, असे त्यांनी सांगितले.
 
दुसरीकडे, लग्नानंतर दुसऱ्या घरी गेलेल्या घरातील मुलीचा संस्थानच्या धार्मिक परंपरेतील अधिकार संपतो का, असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित करण्यात आला. भाग्यश्री यांनी गणपती मंदिरात केलेली कृती चुकीची असल्याचेही विजयसिंहराजे यांनी म्हटले. मात्र, भाग्यश्री यांच्यासह त्यांच्या अन्य दोन मुलींनाही कुटुंबात समान मानसन्मान दिला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गणपतीची प्रतिष्ठापना आणि पूजा एकदा पार पडल्यानंतर पुन्हा मंदिरात येऊन पूजा किंवा आरती करणे योग्य नसल्याचेही विजयसिंहराजे यांनी सांगितले. त्यामुळे भाग्यश्री यांच्या पूजेवरून निर्माण झालेल्या वादाला धार्मिक परंपरा आणि संस्थानच्या प्रथांचा संदर्भ असल्याचे त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट झाले.
वादाशी संबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्यानंतर विसर्जन मिरवणुकीत भाग्यश्री उपस्थित राहणार की नाही, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, अखेर त्या विसर्जन मिरवणुकीतही दिसल्या नाहीत. पूजेच्या वादानंतर त्यांनी सार्वजनिकरित्या अनुपस्थित राहण्याची भूमिका घेतल्याचे चित्र आहे.दरम्यान, विजयसिंहराजे यांच्या प्रकृतीबाबतही काही चर्चा सुरू होत्या. आपण आजारी असल्याच्या चर्चांना त्यांनी स्वतःच उत्तर देत आपण पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे स्पष्ट केले. आपल्यामध्ये पुरेशी ताकद असून प्रकृतीबाबत सुरू असलेल्या चर्चांना कोणतेही कारण नसल्याचे सांगत त्यांनी या अफवांना पूर्णविराम दिला.