भाविकांची कार नाल्यात वाहून गेली 3 चिमुकल्यांसह 8 जणांचा शेवट

    दिनांक :19-Sep-2026
Total Views |
भोपाळ
bhopal accident मध्य प्रदेशातील आगर माळवा जिल्ह्यात सिद्धपीठ माँ बगलामुखी मंदिराजवळ झालेल्या भीषण अपघातात आठ भाविकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन लहान मुले, दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. हे भाविक ओडिशाहून दर्शनासाठी मध्य प्रदेशात आले होते. रात्री झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ही दुर्घटना घडली.
 

bhopal accident 
रात्रभर झालेल्या जोरदार पावसामुळे परिसरातील नदी-नाले दुथडी भरून वाहत होते. त्यातच रात्रीच्या अंधारामुळे रस्त्यालगत असलेल्या नाल्यातील पाण्याचा अंदाज चालकाला आला नसावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पाण्याचा अंदाज चुकल्याने कारवरील नियंत्रण सुटले आणि कार खोल पाण्यात कोसळली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
सकाळच्या सुमारास स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास नाल्यात कार पडल्याचे आले. त्यांनी तातडीने पोलिस आणि स्थानिक प्रशासनाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकारी, पोलीस दल तसेच एसडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने क्रेन आणि पाणबुड्यांच्या मदतीने कार बाहेर काढण्याचे काम सुरू केले. कारमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला अनेक तास प्रयत्न करावे लागले.
या दुर्घटनेची माहिती परिसरात वेगाने पसरल्यानंतर घटनास्थळी ग्रामस्थ आणि भाविकांची मोठी गर्दी झाली होती. बचावकार्य सुरू असताना उपस्थित नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. दुर्घटनेचे दृश्य पाहून परिसरात शोककळा पसरली.दरम्यान, मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. कारचा नोंदणी क्रमांक तसेच वाहनातील अन्य उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मृतांची ओळख पटविण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत. सर्व मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून ते जवळच्या रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात आले आहेत. मृत कुटुंब ओडिशातील असल्याची माहिती समोर आली आहे.या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून, अपघात नेमका कशामुळे झाला याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या कारभाराबाबत रोष व्यक्त केला आहे.