अनिल कांबळे
नागपूर
cyber fraudsters पेन्शन कार्ड तयार करून देण्याच्या नावाखाली, रेल्वे अधिकाऱ्याची बनावट ओळख सांगून तसेच जुन्या नोटा व नाण्यांच्या बदल्यात मोठी रक्कम मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर ठगांनी तीन ज्येष्ठ नागरिकांना तब्बल ६० लाख ७३ हजार रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. अजनी आणि सायबर पोलिस ठाण्यात या तीन स्वतंत्र प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पेन्शन कार्डच्या नावाखाली ५.४९ लाख
पहिल्या प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभागातून सेवानिवृत्त झालेल्या ६० वर्षीय राजेश शिवनारायण वाघमारे यांना ५ लाख ४९ हजार रुपयांचा फटका बसला. १६ सप्टेंबर रोजी एका अनोळखी व्यक्तीने त्यांना फोन करून पेन्शन कार्ड तयार झाले आहे का, अशी विचारणा केली. त्यानंतर आरोपीने एक लिंक पाठवून त्यावर आवश्यक माहिती भरण्यास सांगितले.
वाघमारे यांनी लिंकवर बँक खाते व डेबिट कार्डची माहिती भरल्यानंतर त्यांच्या खात्यातून परस्पर ५.४९ लाख रुपये काढण्यात आले. याप्रकरणी अजनी पोलिसांनी बीएनएस व माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
रेल्वे अधिकाऱ्याची बतावणी; ३१.९७ लाख लंपास
दुसऱ्या घटनेत रामेश्वरी रिंग रोड परिसरातील ६१ वर्षीय सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी विजय सूर्यभान धाबारे यांना ३१ लाख ९७ हजार रुपयांचा फटका बसला. सायबर पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने स्वत:ची ओळख धमेंद्र यादव अशी करून घेतली आणि तो विभागीय रेल्वे व्यवस्थापक असल्याचे सांगितले. धाबारे यांची पेन्शन वाढवून देण्याचे आमिष दाखवून आरोपीने व्हॉट्सअॅपवर बनावट कागदपत्रे पाठवली. विविध फॉर्म भरण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून बँक खाते, एटीएम कार्ड आणि सीव्हीव्हीची माहिती मिळवण्यात आली. त्यानंतर बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्रमधील त्यांच्या खात्यांतून ३१.९७ लाख रुपये काढण्यात आले.
जुन्या नोटा-नाण्यांच्या बदल्यात ५५.२१ लाखांचे आमिष
अभ्यंकरनगर येथील ६६ वर्षीय पिलाजी विठोबा सोमकुवार यांना जुन्या नोटा व नाण्यांच्या बदल्यात ५५ लाख २१ हजार रुपये मिळतील, असे आमिष दाखवण्यात आले. ‘Oldcoin Owner 17’ या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून आरोपींनी त्यांच्याशी संपर्क साधला. बनावट अॅप तसेच सरकारी कर, विमा आणि स्टॅम्पसंदर्भातील बनावट कागदपत्रे दाखवून व्यवहार खरा असल्याचा विश्वास निर्माण करण्यात आला. त्यानंतर सोमकुवार यांच्याकडून आरटीजीएसद्वारे २३ लाख २६ हजार रुपये वळते करून घेण्यात आले. तिन्ही प्रकरणांत पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून, संबंधित मोबाईल क्रमांक, बँक खाती आणि पैशांच्या व्यवहारांचा तपास सुरू आहे.