परीक्षेतील मोबाइल प्रकरणाने घेतले गंभीर वळण!

मुंबई आयआयटी विद्यार्थ्याचा मृत्यू

    दिनांक :19-Sep-2026
Total Views |
मुंबई,
Death of an IIT Bombay student मुंबईतील पवई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेत (आयआयटी मुंबई) शिकणाऱ्या साहिल वाकोडे या विद्यार्थ्याचा शुक्रवारी सायंकाळी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आयआयटी मुंबईच्या ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागात दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणारा साहिल वाकोडे हा यवतमाळचा रहिवासी होता. शुक्रवारी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास तो वसतिगृहातील खोलीत मृतावस्थेत आढळला. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला असून, या घटनेमागील नेमकी परिस्थिती जाणून घेण्यासाठी पवई पोलिसांकडून तपास सुरू आहे.
 
 
Death of an IIT Bombay student
 
आयआयटी मुंबईमध्ये सध्या मध्यसत्र परीक्षा सुरू आहेत. शुक्रवारी परीक्षेदरम्यान साहिल मोबाइल वापरताना आढळल्याचे समोर आले. उत्तर शोधण्यासाठी त्याने परीक्षेची प्रश्नपत्रिका चॅटजीपीटी या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अनुप्रयोगावर अपलोड केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर शिक्षक आणि विभागप्रमुखांनी साहिलशी चर्चा केली आणि त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र, या कारवाईचा त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर विपरीत परिणाम होणार नसल्याचे प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर काही तासांतच त्याचा मृत्यू झाल्याने या संपूर्ण घटनाक्रमाची चौकशी केली जात आहे.
 
 
साहिलच्या मृत्यूची माहिती समोर आल्यानंतर आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी मुख्य प्रवेशद्वाराजवळ एकत्र येत आंदोलन सुरू केले. विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत विविध मागण्या मांडल्या असून, आगामी परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही दिला आहे. संस्थेचे डीन आणि संचालक यांच्या राजीनाम्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. आंदोलनादरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव आयआयटी प्रशासनाने मुख्य प्रवेशद्वार बंद केले आणि बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्याने परिसरातील तणाव वाढला. संस्थेचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
 
 
साहिल वाकोडे याने याच वर्षी जुलैमध्ये आयआयटी मुंबईमध्ये प्रवेश घेतला होता. तो महाराष्ट्रातील यवतमाळचा रहिवासी असून त्याची आई शाळेत शिक्षिका आहे, तर वडील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये कार्यरत आहेत. साहिलच्या मृत्यूची माहिती मिळताच त्याचे आई-वडील आणि काका शुक्रवारी रात्री मुंबईत पोहोचले. साहिलची आई आयआयटी मुंबईच्या परिसरात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत बसली असून, त्याचे वडील आणि काका पवई पोलिस ठाण्यात आहेत. या प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून आयआयटी मुंबईतील काही विद्यार्थ्यांचे जबाबही नोंदवले जात आहेत. साहिलच्या मृत्यूचे नेमके कारण काय होते, परीक्षेतील मोबाइल प्रकरणानंतर त्याच्यावर झालेल्या कारवाईचा या घटनेशी काही संबंध होता का आणि घटनाक्रमात आणखी कोणत्या बाबी घडल्या, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणामागील संपूर्ण परिस्थिती स्पष्ट होणार आहे.