धानाच्या बोनस संदर्भात सकारात्मक निर्णय लवकर व्हावा...

माजी खा. सुनील मेंढे यांची पत्रकार परिषदेत मागणी

    दिनांक :19-Sep-2026
Total Views |
भंडारा,
Former MP Sunil Mendhe at a press conference पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकरी अनेक अडचणींवर मात करीत शेती व्यवसाय करीत आहे. झालेली कर्जमुक्ती शेतकऱ्यांसाठी नक्कीच भक्कम आधार देणारी आहे. मात्र आज दुष्काळाच्या सावटात असलेल्या शेतकऱ्यांना धानाला दिल्या जाणाऱ्या बोनसची प्रतीक्षा आहे. मुख्यमंत्र्यांनी आश्वस्थ केल्याप्रमाणे धानाच्या बोनसची घोषणा करून तो शेतकऱ्यांना द्यावा, यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असल्याची माहिती माजी खासदार सुनील मेंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली. शेतकऱ्यांपैकी कायमच सकारात्मक असलेल्या राज्य सरकारकडून ही अपेक्षा पूर्ण होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. धान उत्पादकांच्या जिव्हाळ्याच्या विषयाला घेऊन आज माजी खासदार सुनील मेंढे यांनी पत्रकार परिषद घेत काही विषयांना स्पर्श केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक कल्याणकारी निर्णय घेतले आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी, वीज बिल माफी हे निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत दिलासादायक आहे. या सर्व निर्णयांसाठी महाराष्ट्र सरकारचे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मनापासून आभार व्यक्त करतो असेही सुनील मेंढे म्हणाले.
 
 
Former MP Sunil Mendhe at a press conference
 
 
आज धान उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती अडचणीची आहे. पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमधील हा धान उत्पादक शेतकरी एल निनोच्या प्रभावामुळे दुष्काळाच्या सावटाखाली आला आहे. धानाचे पीक किती प्रमाणात हाती येईल याची शक्यता कमीच आहे. खतांचा, मधुरी डिझेल आणि इतर कृषी निविष्ठांच्या वाढत्या किमती, उत्पादन खर्चात झालेली वाढ यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. अशावेळी शेतकऱ्यांना बोनस ची प्रतीक्षा आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बोनस देण्यासंदर्भात अधिवेशना दरम्यान केलेले सकारात्मक वक्तव्य शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत करणारे आहे. राज्य सरकारने या संदर्भात निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा करावा अशी मागणी माजी खासदार सुनील मेंढे यांनी केली आहे. या मागणीला घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्य सरकार कायमच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असल्याने बोनस संदर्भात निर्णय घेऊन नक्कीच अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा देतील असा विश्वासही यावेळी सुनील मेंढे यांनी व्यक्त केला.
 
यावेळी मेंढे यांनी इतरही विषयावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी होऊ घातलेल्या भारतीय किसान संघाच्या बोनस साठीच्या मोर्चात आपण सहभागी होणार असल्याचेही सांगितले. पत्रकार परिषदेला भारतीय किसान संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. बोनस देण्याच्या मागणीला घेऊन 5 ऑक्टोबर रोजी भारतीय किसान संघ साकोली येथे मोर्चा काढणार आहे. धान उत्पादक जिल्ह्यातील शेतकरी या मोर्चात सहभागी होतील. मोर्चा सरकारच्या विरोधात नसला तरी शेतकऱ्यांच्या हितासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे भारतीय किसान संघाचे जिल्हा महामंत्री दिनेश कापगते यांनी सांगितले. या मोर्चात सहभागी होण्याची निवेदन आपण सर्व सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदार खासदारांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला महेंद्र निंबार्ते, किसान संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र पांडे, भारत रोकडे, मंगला कोल्हे, यादोराव मुंगमोडे उपस्थित होते.