सिंदी (रेल्वे), १९ सप्टेंबर
Former Sarpanch and Gram Sevak नजीकच्या दहेगाव (गोसावी) ग्रामपंचायतमध्ये झालेल्या आर्थिक व प्रशासकीय गैरव्यवहारावर शिकामोर्तब झाल्यात जमा आहे. याप्रकरणी सरपंच व ग्रामसेवकांविरूद्ध ठपका ठेवण्यात आला आहे.सेलूचे संवर्ग विकास अधिकारी व चमूने ग्रामसभेत झालेल्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी चौकशी समिती गठित केली. त्या समितीला आर्थिक लाभासाठी सरपंच आणि ग्रामसेवकाने संगनमत करून शासकीय दप्तरात खोडतोड करून बोगस ठराव व बोगस नाहरकत प्रमाणपत्र तयार केल्याचा पर्दाफाश झाला होता. याप्रकरणी प्रशासकीय चौकशी करून दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.आमसभेत नागरिकांनी किन्हाळा येथील सर्व्हे २६/१/२ मधील २ हेटर जागेवर नवीन गौण खनिज खानपट्टा मंजूर करण्यासाठी ग्रामसभेची मंजुरी घेतली नव्हती.
तत्कालीन सरपंच संदीप वाणी आणि ग्रामसेवक लिलाधर गुडवार यांनी २० मेच्या मासिक सभेचा ठराव क्रमांक ७ हा २९ मेची खोटी ग्रामसभा दाखवून बोगस तयार केला. त्यासाठी गावकर्यांची कोणतीही संमती घेतली नव्हती. उलट त्यासाठी प्रोसिडिंग बुकमध्ये वेगवेगळ्या पेनचा वापर करून खोडतोड करण्यात आली, हे सिद्ध झाले आहे. सेलूचे बिडीओ देवानंद पाणबुडे यांच्या पथकाने ग्रामपंचायतीचे ८ रजिस्टर जप्त केले. ३१ ऑगस्ट रोजी ग्रामस्थांनी दहेगाव ठाण्यात कायदेशीर तक्रार देखील दाखल केली. जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांच्या आदेशानुसार गुरुवार १७ रोजी पंचायत समिती आष्टीचे गटविकास अधिकारी मयूर पोकळे व विस्तार अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी दहेगाव येथे जाऊन ग्रामस्थांच्या उपस्थितीत सर्व संशयास्पद कागदपत्रे ताब्यात घेतली. किन्हाळा व दहेगाव परिसरातील सर्व गौण खनिज खदानांचे नाहरकत प्रमाणपत्र तात्काळ रद्द करून त्या बंद करण्याचे आदेश जिल्हा खनिकर्म अधिकार्यांनी द्यावे. बोगस कागदपत्रे तयार करणारे सरपंच व ग्रामसेवक यांना तत्काळ निलंबित करावे. जप्त केलेली कागदपत्रं सत्यता पडताळणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवावे. मागील ५ वर्षांच्या विकासकामांचे विशेष लेखापरीक्षण करण्यात यावे. सखोल तपासणीअंती दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.