२१ ते २८ सप्टेंबरदरम्यान राज्यात जोरदार पाऊस!

    दिनांक :19-Sep-2026
Total Views |
मुंबई,
Heavy rainfall in the state राज्यातील काही भागांत मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, शुक्रवारी, १८ सप्टेंबरपासून मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांत पुन्हा पावसाने हजेरी लावली. दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर परभणी, लातूर, हिंगोली, धाराशिव आणि जालना जिल्ह्यांत हलक्या सरी बरसल्या. त्याचवेळी भंडारा आणि वाशिममध्येही रात्रीच्या सुमारास पाऊस झाला. भंडारा जिल्ह्यात अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता.भंडाऱ्यात सुमारे सात दिवसांच्या विश्रांतीनंतर झालेल्या पावसामुळे उकाड्याने त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. भात आणि भाजीपाला पिकांसाठी हा पाऊस फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. मात्र, गणपती आणि गौराईनिमित्त आयोजित केलेल्या जेवणाच्या कार्यक्रमांमध्ये पावसामुळे नागरिकांची काहीशी धावपळ झाली. दुसरीकडे, वाशिम जिल्ह्यात शनिवारी पहाटेपासून काही भागांत सलग दुसऱ्या दिवशी मेघगर्जनेसह पाऊस सुरू होता. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी जिल्ह्यात अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
 
Heavy rainfall in the state
 
 
बंगालच्या उपसागरातील हवामानातील बदलामुळे महाराष्ट्रात पुन्हा पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांच्या माहितीनुसार, २० ते २५ सप्टेंबरदरम्यान महाराष्ट्र आणि गोवा परिसरात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना काहीसा दिलासा मिळू शकतो. १९ ते २२ सप्टेंबरदरम्यान सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर २१ सप्टेंबरला नाशिकमध्ये मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. अहिल्यानगर, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांतही मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २२ सप्टेंबरला मराठवाड्यात पाऊस राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, २१ ते २८ सप्टेंबरदरम्यान महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत चांगला पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मान्सूनच्या अंतिम टप्प्यात होणाऱ्या या पावसामुळे पावसाची प्रतीक्षा असलेल्या भागांना दिलासा मिळण्याची शक्यता असून, शेतीतील पिकांसाठीही तो महत्त्वाचा ठरू शकतो.