आयआयटी मुंबईमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला

विद्यार्थ्यांचे कॅम्पसमध्ये आंदोलन

    दिनांक :19-Sep-2026
Total Views |
मुंबई
iit bombay student आयआयटी मुंबईच्या वसतिगृहात ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा मृतदेह शुक्रवारी (१८ सप्टेंबर) सायंकाळी आढळून आला. प्राथमिक माहितीनुसार, विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर संस्थेच्या परिसरात विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले.
 
 
iit bombay student dies by suicide after alleged exam cheating incident
मृत विद्यार्थ्याची ओळख अद्याप समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थी परीक्षेदरम्यान प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी प्रश्नपत्रिकेतील प्रश्न चॅटजीपीटीवर अपलोड करत असताना पकडला गेला होता. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर तो दुपारी वसतिगृहात परतला. त्यानंतर सायंकाळी त्याचा मृतदेह खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
घटनेची माहिती आयआयटी मुंबईच्या परिसरात पसरल्यानंतर विद्यार्थी मोठ्या संख्येने एकत्र आले. त्यांनी संस्थेच्या परिसरात आंदोलन केले. परिस्थिती अधिक चिघळू नये यासाठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.
 
 
दरम्यान, आयआयटी मुंबई प्रशासनाने या घटनेबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, परीक्षेदरम्यान संबंधित विद्यार्थी प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी प्रश्नपत्रिका चॅटजीपीटीवर अपलोड करत होता. त्याच वेळी हा प्रकार निदर्शनास आला. मात्र, या प्रकरणानंतर विद्यार्थ्यावर तत्काळ कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती. परीक्षा प्रमुख तसेच विद्यार्थ्याच्या विभागप्रमुखांनी त्याच्याशी चर्चा केली होती.
 
 
या चर्चेदरम्यान विद्यार्थ्याला समजावून सांगण्यात आले होते. तसेच या घटनेचा त्याच्या शैक्षणिक भवितव्यावर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही, असे त्याला विश्वासात घेऊन सांगण्यात आले होते. त्यानंतर तो वसतिगृहात परतला होता, अशी माहिती आयआयटी मुंबई प्रशासनाने दिली. काही वेळाने त्याच्या खोलीत तो मृतावस्थेत आढळला.
विद्यार्थ्याच्या मृत्यूबद्दल आयआयटी मुंबई प्रशासनाने दुःख व्यक्त केले आहे. या घटनेमुळे धक्का बसलेल्या विद्यार्थ्यांना, मृत विद्यार्थ्याच्या मित्रांना तसेच शिक्षकांना संस्थेकडून आवश्यक ते पूर्ण सहकार्य करण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.