अनिल कांबळे
नागपूर
instagram friendship इन्स्टाग्रामवरून तीन शाळकरी मुलींशी मैत्री करून त्यांना धमकावल्याचा तसेच भावनिक दबाव टाकून शाळेबाहेरून दुचाकीवर कोराडीला नेऊन ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अजनी पोलिसांनी दोन अल्पवयीनांसह तीन युवकांविरुद्ध पॉक्सो कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजनी परिसरातील एका शाळेत दोन १२ वर्षीय आणि एका १५ वर्षीय मुली शिक्षण घेतात. आरोपींची या मुलींशी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली. त्यानंतर हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली. पुढे आरोपी मुलींचा शाळेच्या परिसरात पाठलाग करीत असल्याचेही पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मैत्री कायम ठेवण्यासाठी आरोपींकडून मुलींवर भावनिक दबाव टाकण्यात आल्याचा आरोप आहे. मुलींनी मैत्री तोडण्याचा प्रयत्न केल्यास स्वत:च्या मनगटाची नस कापून घेण्याची धमकी आरोपी देत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे मुली घाबरल्या होत्या. १६ सप्टेंबर रोजी आरोपींनी शाळेबाहेरून तिन्ही मुलींना दुचाकीवर बसवून कोराडी येथे नेले. तेथे त्यांना काही काळ ठेवण्यात आले. याबाबत कुणाला सांगितल्यास अनोळखी ठिकाणी सोडून देण्याची धमकीही दिल्याचा आरोप आहे. काही वेळानंतर आरोपींनी मुलींना पुन्हा शाळेजवळ आणून सोडले. या घटनेमुळे मुली घाबरलेल्या व मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाल्या. त्यानंतर एका पीडित मुलीच्या आईने अजनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी ऋषिकेश विलास धुर्वे (१८) याच्यासह दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांकडून आरोपींचे इन्स्टाग्रामवरील संभाषण, संपर्क आणि मुलींना कोराडीला नेण्यापूर्वी व त्यानंतर घडलेल्या घटनांचा तपास केला जात आहे.