वेंगुर्ले
first space park पॅरिस येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पेस परिषदेत महाराष्ट्रातून स्वतः सहभागी होत अंतराळ क्षेत्रातील अनेक उद्योजकांशी चर्चा केली. या क्षेत्रात महाराष्ट्रासाठी मोठी संधी असून, देशातील पहिले अंतराळ पार्क राज्यात उभारण्याचा सरकारचा मानस आहे. या प्रकल्पासाठी अनेक उद्योजक गुंतवणुकीस इच्छुक असून, त्यादृष्टीने पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबईत स्पेस परिषदेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी दिली.
गणपती उत्सवासाठी आपल्या मूळगावी वेंगुर्ले येथे आले असताना सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. पॅरिसमध्ये प्रथमच झालेल्या या स्पेस परिषदेला अंतराळ क्षेत्रात कार्यरत विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. महाराष्ट्राच्या वतीने आपण तसेच अधिकारी वर्ग परिषदेत सहभागी झालो होतो. या वेळी अंतराळ क्षेत्रातील काही मोठ्या उद्योजकांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली, असे सामंत यांनी सांगितले.
अंतराळ क्षेत्रात काम करण्याची मोठी क्षमता आणि संधी असल्याचे या चर्चेतून स्पष्ट झाले. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (इस्रो) आवश्यक असलेल्या यंत्रसामग्रीचे विविध भाग तयार करणाऱ्या कंपन्यांशीही चर्चा झाली आहे. या कंपन्यांनी भारतात, विशेषतः महाराष्ट्रात, आपले उद्योग सुरू करावेत, यासाठी त्यांना राज्यात येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशा कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीला चालना मिळू शकते, असे सामंत यांनी स्पष्ट केले.
यासंदर्भात महाराष्ट्रातील स्थानिक उद्योगपतींशीही चर्चा करण्यात आली असून, त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे राज्यात देशातील पहिले अंतराळ पार्क उभारण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. या प्रस्तावित प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी २०२७ मध्ये मुंबईत स्पेस परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. फ्रान्समधील अंतराळ क्षेत्रात कार्यरत अनेक उद्योजक या परिषदेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. अधिकाधिक उद्योजक परिषदेत सहभागी झाल्यानंतर महाराष्ट्रात अंतराळ क्षेत्रात किती गुंतवणूक होऊ शकते, याचे चित्र स्पष्ट होईल, असेही सामंत यांनी सांगितले.
दरम्यान, मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकारची भूमिका सकारात्मक असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. आपण पॅरिसमध्ये असल्याने मनोज जरांगे यांची भेट होऊ शकली नाही, असे त्यांनी सांगितले. जरांगे यांनी केलेल्या १५ मागण्यांपैकी १२ मागण्या यापूर्वीच मान्य करण्यात आल्या असून, उर्वरित मागण्याही सरकार पूर्ण करेल. काही मागण्या न्यायालयीन प्रक्रियेत असून, त्याबाबतही तोडगा निघेल, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.
उपजिल्हाप्रमुख सिद्धेश परब यांच्याशी संबंधित प्रकरणावरही सामंत यांनी भाष्य केले. परब दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. मात्र, खाणकामाला विरोध केल्यामुळे एखाद्याच्या घरात कुणी पुड्या ठेवत असेल, तर या प्रकरणाचा पोलिसांनी सखोल तपास करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. याप्रकरणी आपण स्वतः पोलीस महानिरीक्षकांशी चर्चा केली असून, लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र देणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.