मोहोळ
marigold farming कमी पाणी आणि मर्यादित खर्चात शेतीतून चांगले उत्पन्न मिळवण्याच्या उद्देशाने सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी येथील तरुण शेतकरी सिद्धेश्वर भोसले यांनी झेंडूच्या फुलांची लागवड केली. पाऊण एकर क्षेत्रात केलेल्या या प्रयोगातून सर्व खर्च वजा केल्यानंतर सुमारे अडीच लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाल्याचे त्यांनी सांगितले आहे.
बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सिद्धेश्वर भोसले यांनी उपलब्ध पाण्याचा विचार करून कमी पाण्यात चांगले उत्पादन देणाऱ्या पिकाची निवड करण्यावर भर दिला. त्यानुसार त्यांनी ‘अंबर’ या जातीच्या झेंडूची पाऊण एकर क्षेत्रात लागवड केली. योग्य नियोजन, निगा आणि व्यवस्थापनामुळे लागवडीनंतर अवघ्या दोन महिन्यांत फुलांची तोडणी सुरू झाली.
सध्या त्यांच्या शेतातून दर दोन दिवसांनी सुमारे २०० कॅरेट झेंडूच्या फुलांची तोडणी होत असल्याचे सांगण्यात आले. पापरी गावातील बाजारपेठेत या फुलांची विक्री केली जात आहे. सध्या झेंडूला बाजारात किलोमागे ३० ते ४० रुपयांचा दर मिळत असून व्यापारी थेट शेतातूनच फुलांची खरेदी करीत आहेत. त्यामुळे फुले बाजारात नेण्यासाठी लागणारा अतिरिक्त वेळ आणि वाहतुकीचा खर्चही कमी होत आहे.
भोसले यांच्या माहितीनुसार, पाऊण एकर झेंडूच्या लागवडीसाठी त्यांना साधारण ३५ ते ४० हजार रुपये खर्च आला. फुलांच्या विक्रीतून मिळालेल्या उत्पन्नातून लागवडीचा संपूर्ण खर्च वजा केल्यानंतर त्यांना सुमारे अडीच लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे.
कमी पाण्यात आणि कमी खर्चात घेता येणाऱ्या पिकांची माहिती घेऊन तरुणांनी शेतीकडे पाहण्याची गरज असल्याचे सिद्धेश्वर भोसले यांनी म्हटले आहे. केवळ नोकरीच्या मागे न लागता तंत्रज्ञानाचा वापर, योग्य पिकाची निवड आणि शास्त्रीय व्यवस्थापन यांच्या माध्यमातून शेतीतही आर्थिक प्रगती साधता येऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या प्रयोगामुळे परिसरातील इतर तरुण शेतकऱ्यांमध्येही या पद्धतीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.