सिएटल तंत्रज्ञान समुदायाचे भारतासोबत दृढ संबंध

मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष व सीईओ सत्या नडेला यांनी केली प्रशंसा

    दिनांक :19-Sep-2026
Total Views |
न्यू यॉर्क,
Microsoft CEOएआय, क्वांटम कंप्युटिंग आणि एंटरप्राईझ सॉफ्टवेअरसह विविध क्षेत्रांतील प्रमुख भारतीय वंशाच्या तंत्रज्ञान सीईओंना संबोधित करताना सिएटलच्या वाढत्या तंत्रज्ञान समुदायाची आणि भारतासोबतच्या त्याच्या दृढ होत असलेल्या संबंधांची मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष आणि सीईओ सत्या नडेला यांनी प्रशंसा केली. कॉन्सुल जनरल प्रकाश गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली सिएटलमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने आयोजित केलेल्या एका विशेष कार्यक्रमात ते अतिथी म्हणून बाेलत होते.
 
 
sambandh
‘आयडियाज४इंडिया इंडियन अमेरिकन टेक सीईओज फोरम, अनलॉकिंग द टेक डिव्हिडंड’ असे शीर्षक असलेला हा कार्यक्रम गुरुवारी वाणिज्य दूतावासाच्या आवारात आयोजित करण्यात आला होता. फेब्रुवारीमध्ये नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिटचा हा पुढील टप्पा होता. ग्रेटर सिएटल परिसरात असलेल्या भारतीय-अमेरिकन तंत्रज्ञान समुदायाच्या अद्वितीय कौशल्यातून शिकणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
 
 
नडेला पुढे म्हणाले, सुमारे ३५ वर्षांपासून सिएटलमधील तंत्रज्ञान समुदायाची वाढ होताना पाहिल्याचा अभिमान वाटतो़ भारतासोबतचे संबंध अधिक दृढ होत असल्याचे पाहून आनंद होत आहे़ कृत्रिम बुद्धिमत्तेचे (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) वर्णन सर्व-उद्देशीय तंत्रज्ञान असे करत त्याचे फायदे विविध देश, समुदाय आणि क्षेत्रांमध्ये त्याच्या व्यापक प्रसारावर अवलंबून असतील, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला संबोधित करताना अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय क्वात्रा यांनी भारत-अमेरिका तंत्रज्ञान भागीदारी अधिक दृढ करण्याच्या भारतीय वंशाच्या टेक सीईओ आणि मंचावरील इतर सहभागींच्या इच्छेचे स्वागत केले.
 
४० पेक्षा जास्त भारतीय वंशाचे सीईओ व सीटीओ सहभागी
या विशेष मंचावर भारतीय वंशाचे आघाडीचे टेक सीईओ एकत्र आले होते़ त्यापैकी अनेकांनी एआय, क्वांटम कम्प्युटिंग, सेमीकंडक्टर, क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर, एरोस्पेस आणि एंटरप्राइझ सॉफ्टवेअर यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आघाडीवर तीन दशकांहून अधिक काळ घालवला आहे.
 
या मंचावर ४० पेक्षा जास्त भारतीय वंशाचे सीईओ आणि सीटीओ सहभागी झाले होते़ यात मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन, बोईंग, ओपनएआय, अँथ्रोपिक, इंटेल, वीम सॉफ्टवेअर, हेलिऑन, रिदम्स एआय, झेनोटी, अनिका डेटा, सीकआउट, स्टॅनले आणि पॅसिफिक नॉर्थवेस्टमधील इतर आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांमधील अधिकाऱ्यांचा समावेश होता.