अनिल कांबळे
नागपूर,
nagpur police raid अनेक जण शहराच्या लगत असलेल्या ढाब्यांंवर जाऊन मद्यप्राशन आणि जेवणाचा बेत आखतात. पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील महामार्गावरील कोणत्याही ढाब्यावर जेवणासह दारु बिनधास्त पिण्याची परवानगी असते. मात्र, आता असे ढाबे पोलिस आयुक्तांच्या रडारवर आले आहेत. एकाच रात्री तब्बल १० ढाब्यांवर गुन्हे शाखेने छापेमारी केली. त्यामुळे ढाबेमालकासह ग्राहकांमध्येही एकच तारांबळ उडाली होती. एकाच रात्री १० ढाब्यांवर कारवाई करण्यात आल्याने नियमबाह्य पद्धतीने मद्य पुरविणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. ‘पुरणसिंग’ ढाब्याचा व्यवस्थापक दिनेश गेडाम, ‘बंजारा चुल्हा’चा मालक सुधाकर बोरकर, राणाप्रतानगर पोलिस हद्दीतील ‘बाबा सावजी’चा मालक अशोक पवनीकर, हुडकेश्वरमधील 'पाटलाचा वाडा'चा मालक अमित पाटील, ‘सिंग दरबार’चा चालक कंवलपाल सिंग अशी गुन्हा दाखल केलेल्या ढाबा मालकांची नावे आहेत.
श्रावण महिना संपल्यानंतर शहरालगतच्या ढाब्यांमध्ये मटन-चिकनवर ताव मारण्यासाठी ग्राहकांची गर्दी वाढली आहे. मटन-चिकन खाण्यासाठी असे ढाबे निवडले जातात जेथे दारु पिण्यास किंवा अवैधरित्या दारु विक्री केल्या जाते. शहरातील वाडी, हिंगणा, एमआयडीसी, हुडकेश्वर, बेलतरोडी, कोराडी, पारडी, यशोधरानगर, मानकापूर आणि गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काही ढाब्यांवर चक्क ग्राहकांना दारु पुरवली जाते. त्यामुळेच ढाब्यांवर ग्राहकांची गर्दी वाढते. तसेच बजाजनगर, सीताबर्डी, प्रतापनगर, सदर आणि अंबाझरी ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हॉटेल्समध्ये सुद्धा ग्राहकांना दारु पिण्यास परवानगी दिली जाते. काही ठिकाणी चक्क हुक्कासुद्धा ढाब्याचे संचालक पुरवित असल्याची माहिती आहे. ढाब्यावर परवानगी नसतानाही मद्य प्राशनासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याच्या तक्रारी पोलिस आयुक्तांकडे प्राप्त झाल्या होत्या. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी वाढत्या प्राणघातक हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेशाखेला कारवाईच्या सूचना दिल्यानंतर ही मोहीम राबविण्यात आली. यावरून सहपोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी ढाब्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन, राणाप्रतापनगर आणि गिट्टीखदान हद्दीत प्रत्येकी दोन, तर हिंगणा आणि हुडकेश्वर परिसरातील ढाब्यांसह तहसील हद्दीतील प्रतिष्ठानांवरही कारवाई करण्यात आली. कारवाई न करता अशा प्रतिष्ठानांना पाठीशी घातल्यास संबंधित ठाणेदाराला जबाबदार धरले जाईल, असा इशारा पोलिस आयुक्तांनी दिला आहे.
पोलिसांचे ‘अर्थपूर्ण’ संबंध
डीबी पथकातील ‘वसुली’ करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे ढाब्याच्या मालकासोबत ‘अर्थपूर्ण’ संबंध असतात. त्यामुळे सर्वाधिक वाडी,हिंगणा आणि एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ढाब्यांवर मध्यरात्रीनंतर गर्दी वाढते. अनेक ढाबे हे गुन्हेगारांचा अड्डा बनत चालले आहेत. ठाणेदारांचे नियंत्रण नसल्यामुळे असे ढाब्यावर अवैध धंदेसुद्ध सुरु असतात, अशी माहिती आहे.
ढाब्यावर ग्राहकांना दारु पिण्यास परवानगी देणाऱ्यांवर छापे घालण्यात येत आहे. असा प्रकार अजिबात सहन केल्या जाणार नाही. ढाब्यावर दारु पिताना आढळल्यास ग्राहकांसह ढाब्याच्या मालकावरही कायदेशिर कारवाई करण्यात येईल.
- नवीनचंद्र रेड्डी (पोलिस सहआयुक्त, नागपूर शहर)