हा काळ माझ्यासाठी कठीण!

एशियन गेम्समधून नीरज चोप्राची माघार

    दिनांक :19-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Neeraj Chopra withdraws from Asian Games भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा यंदाच्या एशियन गेम्समध्ये सहभागी होऊ शकणार नसल्याने भावुक झाला आहे. प्रशिक्षणादरम्यान झालेल्या घोट्याच्या अस्थिबंधाच्या दुखापतीमुळे त्याने एशियन गेम्स २०२६ आणि डायमंड लीगच्या अंतिम स्पर्धेतून माघार घेतली आहे. स्पर्धा सुरू झाल्यानंतर नीरजने लिंक्डइनवरील आपल्या पोस्टमधून या काळातील भावना व्यक्त केल्या. एशियन गेम्सने त्याच्या कारकिर्दीला काही खास क्षण दिले असून, यंदा भारताचे प्रतिनिधित्व करता न येणे त्याच्यासाठी अत्यंत कठीण असल्याचे त्याने सांगितले आहे.नीरजने आपल्या पोस्टमध्ये २०१८च्या जकार्ता एशियन गेम्सची आठवण सांगितली. त्यावेळी वयाच्या २०व्या वर्षी भारताचा ध्वजवाहक म्हणून तो मैदानात उतरला होता.
 
 
 
सद ५ ७
 
जॅव्हलिन थ्रोमध्ये भारतासाठी १९८२नंतर मिळालेल्या या विशेष यशामुळे देशाचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी आणि कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षांचे ओझे त्याला प्रथमच जाणवले, असे त्याने नमूद केले. त्यानंतर ५ वर्षांनी २०२३च्या हांगझोऊ एशियन गेम्समध्ये विजेतेपदाचा बचाव करण्यासाठी परतणेही त्याच्यासाठी तितकेच महत्त्वाचे होते. नीरजने २०१८ आणि २०२३ या दोन्ही एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक मिळवले होते.यंदाच्या स्पर्धेत सहभागी होता न आल्याची खंत व्यक्त करताना नीरजने सांगितले की, तो सध्या घोट्याच्या अस्थिबंधाच्या दुखापतीशी झुंज देत आहे. बराच विचार केल्यानंतर स्पर्धेत उतरणे शक्य नसल्याचे स्वीकारावे लागले. देशाच्या अपेक्षा घेऊन मैदानात उतरणे हा सन्मान असतो; मात्र त्या संधीपासून दूर राहावे लागणे वेदनादायी आहे, असे त्याने म्हटले. दुखापती हा खेळाचा भाग असल्याचे सांगताना परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण नसले तरी त्याला कसा प्रतिसाद द्यायचा, हे आपल्या हातात असल्याचेही नीरजने स्पष्ट केले.
 
 
आपल्या आजूबाजूच्या लोकांचे अशा काळात किती महत्त्व असते, यावरही नीरजने भाष्य केले. सराव, प्रवास आणि स्पर्धांमुळे बराच काळ घरापासून दूर राहावे लागते, त्यामुळे सकारात्मक आणि जमिनीवर ठेवणारे लोक जवळ असणे आवश्यक असल्याचे त्याने सांगितले. कठीण काळात सतत दुखापत कशी झाली, किती दिवस बाहेर राहणार किंवा उपचार कसे सुरू आहेत, असे विचारण्याऐवजी काही मित्र त्याच्याशी इतर विषयांवर बोलतात, जुन्या आठवणी काढतात आणि हसतात, असे नीरजने लिहिले. अशा संवादामुळे पुढची स्पर्धा हेच आयुष्यातील सर्वस्व नाही, याची जाणीव होत असल्याचेही त्याने नमूद केले. एशियन गेम्समध्ये यावेळी सहभागी होता न आल्याची उणीव नक्कीच जाणवेल, असे सांगत नीरजने नागोयामध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. स्वतः मैदानात नसला तरी भारतीय पथकाला पाठिंबा देत राहणार असल्याचे त्याने स्पष्ट केले. एशियन गेम्सच्या आपल्या जुन्या आठवणी अनमोल असल्याचे सांगत, यंदाच्या स्पर्धेत सहभागी खेळाडूंनाही अशाच संस्मरणीय आठवणी मिळाव्यात, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली.