चंद्रपूर,
गोवंशांची कत्तल करून अवैधपणे गोमांसाची विक्री सुरू असलेल्या येथील रय्यतवारी कॉलरी परिसरातील एका घरावर रामनगर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या 3 गोवंशांनाही जीवदान दिले असून, घटनास्थळावरून गोमांसासह एकूण 93 हजार 800 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.चंद्रपूर शहर परिसरात अवैधपणे गोवंशाची कत्तल आणि गोमांस विक्री करणार्या समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश पोलिस अधीक्षक आयुष नोपानी यांनी रामनगर पोलिस ठाण्याला दिले आहे. त्यानुसार पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी शोध पथकातील अधिकारी व अंमलदारांना अशा अवैध धंद्यांची पाळेमुळे खणून काढण्याचे आदेश दिले.

दरम्यान रय्यतवारी कॉलरी येथील डिस्पेन्सरी चौकात राहणारा अब्दुल गणी शेख ईस्माईल कुरेशी (49) याने आपल्या घरात कत्तलीसाठी गोवंशांना बेकायदेशीरपणे डांबून ठेवले असून, तो घरातूनच गोमांसाची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती कळताच 18 सप्टेंबर रोजी पोलिसांनी पशुवैद्यकीय अधिकार्यांना सोबत घेऊन पंचांसमक्ष आरोपी अब्दुल गणी कुरेशी याच्या घरावर अचानक धाड टाकली. घराची झडती घेतली असता घरात गोमांस, विक्रीसाठी लागणारा वजनकाटा, मांस तोडण्यासाठी लागणारा सत्तूर आणि लाकडी कुंडा असा साहित्यसाठा आढळून आला. याशिवाय कत्तलीसाठी बांधून ठेवलेली तीन जनावरे, ज्यामध्ये दोन गायी व एका गोर्ह्याचा समावेश होता, ती पोलिसांना सुखरूप मिळून आली. पोलिसांनी सर्व साहित्य व जनावरांसह एकूण 93 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करीत तीनही गोवंशांची सुटका केली. याप्रकरणी आरोपी अब्दुल गणी कुरेशी याच्याविरुद्ध रामनगर पोलिस ठाण्यात ‘महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम 1995’ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.