मुंबई
sairat actor arbaaz shaikh महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे सध्या विविध कारवायांमुळे चर्चेत आहेत. गैरप्रकार निदर्शनास आणून देण्यासाठी सोशल मीडियावरून नागरिकांकडून त्यांना टॅग केले जात असून, अशा तक्रारींची दखल घेत तातडीने कारवाई होत असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर ‘सैराट’ चित्रपटातील ‘ल्याड्या’ची भूमिका साकारणारा अभिनेता अरबाज शेख याने तुकाराम मुंढे यांच्याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांचे आभार मानले आहेत.
काही दिवसांपूर्वी अरबाजच्या वडिलांचे निधन झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना अरबाजने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत रुग्णालयाकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जात असल्याचा आरोप केला होता. त्याच्या या पोस्टनंतर अनेकांनी त्याला मदतीचा हातही पुढे केला होता.
यानंतर आता अरबाजने पुन्हा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला असून, त्यात त्याने तुकाराम मुंढे यांचे आभार मानले आहेत. आपल्या कुटुंबावर कठीण प्रसंग ओढावला असताना मुंढे यांनी मदत केली आणि संबंधित प्रकरणात कारवाई केली, असे अरबाजने म्हटले आहे.
अरबाजने आपल्या व्हिडीओमध्ये रुग्णालयांशी संबंधित तक्रारी आणि वैद्यकीय क्षेत्रातील कथित गैरप्रकारांबाबत अधिक पारदर्शक चौकशीची आवश्यकता व्यक्त केली. यापूर्वीही रुग्णालयांविषयी अनेक तक्रारी समोर आल्या असून, त्यावर तातडीने कारवाई करण्यात आल्याचा उल्लेख त्याने केला. डॉक्टरांकडून रुग्णाला दुसऱ्या डॉक्टरांकडे रेफर केल्यानंतर कमिशन मिळते का, ॲम्बुलन्सच्या शुल्काबाबत काही गैरप्रकार होतात का, तसेच सीटी स्कॅनसाठी रेफर करण्यामागे कथित कमिशनचा व्यवहार आहे का, याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे त्याने सांगितले. या प्रकारांमध्ये संबंधित रुग्णालयाचा सहभाग आहे का, याचाही तपास व्हावा, अशी मागणी त्याने केली.
आपल्या कुटुंबावर आलेल्या प्रसंगी तुकाराम मुंढे यांनी मदत केल्याने आपण त्यांचा वैयक्तिकरित्या आभारी असल्याचे अरबाजने स्पष्ट केले. महाराष्ट्राला प्रामाणिकपणे कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची गरज असल्याचेही त्याने नमूद केले.दरम्यान, या व्हिडीओसोबतच्या कॅप्शनमधून अरबाजने आपली भूमिका अधिक स्पष्ट केली आहे. रुग्णाकडे केवळ ग्राहक म्हणून न पाहता तो एक माणूस आहे, या भावनेतून वैद्यकीय सेवा दिली जावी, असा त्याचा सूर आहे. मात्र, सर्वच डॉक्टर किंवा रुग्णालये गैरप्रकार करतात असे म्हणणे योग्य नसल्याचेही त्याने स्पष्ट केले. आजही अनेक डॉक्टर आणि रुग्णालये प्रामाणिकपणे, माणुसकीने आणि सेवाभावाने काम करत असल्याचे सांगत त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला.हि भूमिका प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या डॉक्टरांविरोधातील नसून, वैद्यकीय क्षेत्रातील कथित गैरप्रकारांबाबत पारदर्शक चौकशी व्हावी, अशी मागणी असल्याचे अरबाजने आपल्या पोस्टमधून स्पष्ट केले आहे. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.