मुंबई
samay raina वादग्रस्त परिस्थितीनंतर कॉमेडियन समय रैनाने पुन्हा एकदा दमदार कमबॅक केलं आहे. त्याचा ‘इंडियाज गॉट लेटेंट’चा नवा एपिसोड नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला असून, या भागात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी, अभिनेता आणि सोशल मीडिया स्टार भुवन बाम, कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाबडा आणि कॉमेडियन कैस्तुभ हे पॅनलवर सहभागी झाले होते. समयने आपल्या खास शैलीत पॅनलवरील कलाकारांना रोस्ट करत एपिसोडमध्ये चांगलीच रंगत आणली.
एपिसोडदरम्यान समयने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी याच्यासोबत खास गमतीजमती केल्या. नवाजुद्दीन यांच्या गाजलेल्या ‘सेक्रेड गेम्स’ या सीरिजचा उल्लेख करत समयने त्यांच्या भूमिकेवरून त्यांना मिश्कीलपणे रोस्ट केले. सीरिजमध्ये नवाजुद्दीन यांचे पात्र ड्रग्स घेत, दारू पित आणि वेश्यांसोबत संबंध ठेवत असल्याचे दाखवण्यात आले होते. त्याचा संदर्भ घेत समयने नवाजुद्दीन यांच्यावर विनोद केला.
समयच्या या टिप्पणीवर नवाजुद्दीन यांनीही तितक्याच मिश्कील अंदाजात उत्तर दिले. या शोमध्ये येतानाही आपण त्याच प्रकारची तयारी करून आलो असल्याचे त्यांनी म्हटले. त्यावर समयने त्यांना सावध करत, “सर, तुम्ही विचार करून बोला, या सीटवर खूप काही घडलेलं आहे,” अशा आशयाची टिप्पणी केली. दोघांमधील हा संवाद सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
यानंतर समयने आपला मोर्चा भुवन बामकडे वळवला. भुवनला रोस्ट करताना समयने, “अखेर तू युट्यूबवर आलास,” अशी मिश्कील टिप्पणी केली. त्यानंतर भुवनने युट्यूब का सोडले, असा प्रश्न त्याने विचारला. या संवादातूनही समयने आपल्या नेहमीच्या विनोदी शैलीत भुवनची फिरकी घेतली.
या नव्या एपिसोडला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. नेटफ्लिक्ससोबतच हा भाग युट्यूबवरही उपलब्ध करण्यात आला असून, प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या दोन तासांत त्याला २० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.
एपिसोडनंतर सोशल मीडियावरही प्रेक्षकांच्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. एका नेटकऱ्याने नवाजुद्दीन यांच्या प्रतिक्रियेवर मिश्कील टिप्पणी करत, आता कोणतीही जोखीम न घेण्याचा विचार करत असतील, असे म्हटले. तर आणखी एका युजरने भुवन बाम आणि नवाजुद्दीन दोघेही बोलताना विशेष काळजी घेत असल्याचे नमूद केले.
वादानंतर काही काळ चर्चेपासून दूर राहिलेल्या समय रैनाच्या पुनरागमनाला मिळणारा प्रतिसाद आणि नव्या एपिसोडमधील त्याची कॉमेडी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.