सोलापूर
solapur sina river incident गणेशोत्सवाच्या सुट्टीसाठी मुंबईहून आजोळी आलेल्या पाच तरुणांपैकी दोघांचा सीना नदीत बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना माढा तालुक्यातील निमगाव परिसरात शुक्रवारी घडली. नदीपात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणांना पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात गेले. यावेळी आरडाओरड झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी धाव घेत तिघांना वाचवले. मात्र, प्रफुल्ल गायकवाड (२५) आणि प्रतीक भालेराव (२३) हे दोघे पाण्यात बेपत्ता झाले.
गणेशोत्सवाच्या सुटीनिमित्त मुंबईतील पाच तरुण बार्शी तालुक्यातील भोईंज येथे आजोळी आले होते. शुक्रवारी प्रवीण गायकवाड (३०), प्रफुल्ल गायकवाड (२५), प्रतीक भालेराव (२३), मंगेश अंधारे (२७) आणि पिल्या खंडागळे (१५) हे पाच जण निमगाव (मा.) येथील सीना नदीवर पोहण्यासाठी गेले होते. नदीपात्रात उतरल्यानंतर ते हळूहळू खोल पाण्यात गेले. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्यातील काही जण बुडू लागले.
पाण्यात अडकल्यानंतर तरुणांनी मदतीसाठी आरडाओरड केली. आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले आणि त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. या प्रयत्नांत तिघांना पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. मात्र, प्रफुल्ल गायकवाड आणि प्रतीक भालेराव यांचा पाण्यात शोध लागला नाही. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली.
दरम्यान, उजनी धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने सीना नदीतील पाण्याची पातळी वाढली होती. त्याचबरोबर नदीच्या प्रवाहालाही वेग आला होता. अशा परिस्थितीत नदीची खोली आणि पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न घेता तरुण पोहण्यासाठी नदीपात्रात उतरल्याचे सांगण्यात येत आहे. प्रवाहाच्या वेगामुळे त्यांना पाण्यासोबत वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बेपत्ता असलेल्या प्रफुल्ल गायकवाड आणि प्रतीक भालेराव यांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या आनंदासाठी आजोळी आलेल्या तरुणांवर ओढवलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.