अनिल कांबळे
नागपूर
nagpur दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून मुलाने आईला शिवीगाळ करून मारहाण केली आणि तिचा गळा आवळल्याची घटना बुधवारी रात्री रामगड परिसरात घडली. याप्रकरणी ४९ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून न्यू कामठी पोलिसांनी तिच्या २६ वर्षीय मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. उषा (४९), रा. रामगड धान्य गोदामाजवळ, असे पीडित महिलेचे नाव आहे. त्यांचा मुलगा विजय ऊर्फ लखन प्रमोद नेवारे (२६) याच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयला दारूचे व्यसन असल्याचे तक्रारीत नमूद आहे. तो वारंवार आईकडे दारू घेण्यासाठी पैसे मागत होता. पैसे देण्यास नकार दिल्यास तो आईला त्रास देत असल्याचा आरोप आहे.
बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास उषा या घरी असताना विजयने त्यांच्याकडे दारू घेण्यासाठी पैसे मागितले. मात्र, त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या विजयने आईला शिवीगाळ करीत ठोसे मारल्याचे तक्रारीत नमूद आहे.
यानंतर त्याने आईचा गळा पकडून जोरात दाबल्याचा आरोप आहे. गळा आवळल्याने जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, याची जाणीव असूनही त्याने हे कृत्य केल्याचे तक्रारीत नमूद आहे. उषा यांनी प्रतिकार करीत मुलाच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली. या घटनेत त्यांना दुखापत झाली. मात्र, दुखापत गंभीर नसल्याचे सांगत त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी न्यू कामठी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी विजयविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील दुखापत करणे व मारहाणीशी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास न्यू कामठी पोलिस करीत आहेत.