इराण,
America's attack in Iran अमेरिकेने इराणवर अवघ्या तीन दिवसांत दुसऱ्यांदा हल्ला केल्याचा दावा करण्यात आला आहे. अमेरिकन लष्कराने मंगळवारी रात्री सिरिक, खुझेस्तान, केशम बेट आणि बंदर अब्बास या भागांना क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या माध्यमातून लक्ष्य केले. सिरिकमध्ये एका विवाह सोहळ्यादरम्यान क्षेपणास्त्रांचा मारा झाल्याने मोठी जीवितहानी झाली. या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला असून ६८ जण जखमी झाले आहेत. मेहर न्यूजच्या वृत्तानुसार, मृतांमध्ये चार वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. हल्ल्यानंतर समोर आलेल्या छायाचित्रे आणि व्हिडिओमध्ये रुग्णालयात जखमी मुलांवर उपचार सुरू असल्याचे दिसून आले.

खुझेस्तान प्रांतात झालेल्या हल्ल्यात सात जण ठार तर आठ जण जखमी झाल्याचा दावा इराणकडून करण्यात आला आहे. इराणची सरकारी वृत्तसंस्था IRNA नुसार, या भागातील तीन ठिकाणांना अमेरिकेने लक्ष्य केले. दुसरीकडे, अमेरिकेने आपल्या कारवाईत इराणच्या लष्करी तळांना निशाणा बनवल्याचे म्हटले आहे. अमेरिकेच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना इराणने जॉर्डन आणि बहरीनमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले केल्याचा दावा केला असून, त्यातही अनेक जणांच्या मृत्यूची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, अमेरिकेच्या नौदलाचे विमानवाहू युद्धनौका USS Abraham Lincoln बुधवारी थायलंडमध्ये दाखल झाले. सलग २०० दिवसांहून अधिक काळ समुद्रात राहिल्यानंतर हे युद्धनौका पाच दिवसांच्या विश्रांतीसाठी थायलंडमध्ये थांबले आहे. या जहाजावर सुमारे ५,००० सैनिक आणि कर्मचारी आहेत. पश्चिम आशियात इराणशी संबंधित मोहिमेत सहभागी असलेल्या या कर्मचाऱ्यांना प्रदीर्घ काळ समुद्रात राहावे लागले. इतक्या मोठ्या कालावधीत कोणत्याही बंदरावर थांबण्याची संधी न मिळाल्याने त्यांच्या मानसिक आरोग्य आणि राहणीमानाबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.