मुंबई
anna hazare ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अण्णा हजारे यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुग्णालयात जाऊन अण्णा हजारे यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन हेही मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी अण्णा हजारे यांना कुकडी सिंचन प्रकल्पाच्या खर्चात सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांकडून ही माहिती मिळाल्यानंतर अण्णा हजारे यांनी आनंद व्यक्त केला.
यापूर्वी १ सप्टेंबर रोजी सकाळी राज्य सरकारमधील कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही रुग्णालयात जाऊन अण्णा हजारे यांची भेट घेतली होती. लघवीशी संबंधित समस्यांमुळे अण्णा हजारे यांना राळेगणसिद्धी येथून मुंबईत उपचारासाठी आणण्यात आले आहे. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेल्या तपासण्यांमध्ये त्यांच्या किडनीमध्ये संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.
अण्णा हजारे यांची प्रकृती यापूर्वीही बिघडली होती. गेल्या आठवड्यात त्यांना शिरूर येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, काही दिवसांतच पुन्हा प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी राळेगणसिद्धीहून मुंबईत आणण्यात आले.
दरम्यान, महाराष्ट्र सरकारने anna hazare माहितीचा अधिकार अधिनियमात काही नवीन नियम लागू केले होते. या नियमांवरून अण्णा हजारे यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारविरोधात मोर्चा उघडला होता. या नियमांविरोधात त्यांनी उपोषणाचा इशाराही दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे नवीन नियम स्थगित करण्याची घोषणा केली होती.