भारताच्या मदतीबद्दल बालेन शाह म्हणाले ‘थँक्यू’

    दिनांक :02-Sep-2026
Total Views |
काठमांडू,
Bharatal Balen Shah said thank you नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरानंतर भारत आणि चीनकडून मिळत असलेल्या मदतीबद्दल नेपाळचे पंतप्रधान बालेन्द्र शाह यांनी बुधवारी, २ सप्टेंबर रोजी संसदेत दोन्ही देशांचे आभार मानले. एवढ्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीत आंतरराष्ट्रीय सहकार्य घेण्यास कोणताही संकोच करण्याचा प्रश्नच नसल्याचे शाह यांनी स्पष्ट केले. आपत्ती व्यवस्थापनासाठी सुरुवातीपासूनच आंतरराष्ट्रीय स्तरावर मदत आणि सहकार्य घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
 

balen 
 
नेपाळमध्ये २६ ऑगस्ट रोजी अचानक आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असून, आतापर्यंत ११२७ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. तर ४००० हून अधिक नागरिक अद्याप बेपत्ता आहेत. पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालेन शाह यांच्याशी फोनवरून संवाद साधत मदतीचे आश्वासन दिले होते. त्यानंतर भारताकडून सातत्याने मदत पाठवली जात आहे. यामध्ये अन्नधान्य, औषधे, पूल उभारणीसाठी आवश्यक साहित्य तसेच डीएनए तज्ज्ञांच्या पथकाचा समावेश आहे. दरम्यान, पुराच्या संकटादरम्यान नागरिकांना वेळेवर माहिती देण्यात सरकार अपयशी ठरल्याच्या आरोपावरही पंतप्रधान शाह यांनी संसदेत स्पष्टीकरण दिले. सरकारकडून तब्बल १.१ मिलियन म्हणजेच ११ लाख नागरिकांना एसएमएसच्या माध्यमातून आपत्तीची माहिती पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ही आपत्ती अपेक्षेपेक्षा अधिक मोठी आणि अनपेक्षित स्वरूपाची होती, त्यामुळे सरकारने परिस्थितीची माहिती मिळताच नागरिकांना संदेश पाठवल्याचा दावा शाह यांनी केला.
 
 
राज्य आणि स्थानिक पातळीवरील प्रशासनामध्ये समन्वयाचा अभाव असल्याच्या प्रश्नावरही शाह यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. राज्य आणि स्थानिक प्रशासनाशी सातत्याने चर्चा सुरू असल्याचे सांगत, याच समन्वयाच्या माध्यमातून बचाव आणि मदतकार्य राबवले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. पूरस्थितीत हायड्रोइलेक्ट्रिक प्रकल्पाच्या बोगद्यात अडकलेल्या नागरिकांच्या बचावकार्याबाबतही संसदेत प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर शाह यांनी राज्यातील सर्व पक्ष सुरुवातीपासूनच बचावकार्यात सहभागी असल्याचे सांगितले. बोगद्यातील बचावकार्य हे अत्यंत वेगळ्या स्वरूपाचे असल्याने त्यासाठी मोठ्या प्रमाणात तांत्रिक कौशल्याची आवश्यकता आहे. उपलब्ध संसाधनांच्या आधारे सरकारकडून बचावकार्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे पंतप्रधान बालेन्द्र शाह यांनी स्पष्ट केले.