नवी दिल्ली,
Delhi swine flu 3,218 patients राष्ट्रीय राजधानी दिल्लीत यंदा स्वाइन फ्लू अर्थात H1N1 संसर्गाने वेग घेतला असून, ३१ ऑगस्टपर्यंत ३,२१८ रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, यंदाची रुग्णसंख्या २०२४ मधील संपूर्ण वर्षाच्या ३,१५१ रुग्णांपेक्षाही अधिक झाली आहे. २०१९ नंतर दिल्लीतील H1N1 संसर्गाची ही सर्वाधिक नोंद ठरली आहे.ऑगस्टच्या अखेरीस रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसून आली. २९ ऑगस्ट रोजी तब्बल १९९ नवीन रुग्ण आढळल्याने एकूण संख्या ३,००६ वर पोहोचली होती. त्यानंतर ३० ऑगस्टला ४८, तर ३१ ऑगस्टला आणखी १६४ रुग्णांची भर पडली. त्यामुळे ३१ ऑगस्टपर्यंत दिल्लीतील H1N1 रुग्णांचा आकडा ३,२१८ झाला.

दिल्लीतील रुग्णांसोबतच दिल्लीबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांचा समावेश केल्यास, ३१ ऑगस्टपर्यंत H1N1च्या एकूण रुग्णांची संख्या ३,८२८ इतकी नोंदवण्यात आली आहे. राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राच्या आकडेवारीनुसार, २०१९ मध्ये दिल्लीत H1N1चे ३,६२७ रुग्ण आढळले होते आणि ३१ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर २०२० मध्ये ४१२, २०२१ मध्ये ९२, २०२२ मध्ये ४४२, २०२३ मध्ये २०९, २०२४ मध्ये ३,१५१ आणि २०२५ मध्ये २२९ रुग्णांची नोंद झाली. यंदा आतापर्यंत सरकारी आकडेवारीत H1N1मुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. संसर्गाचा वाढता वेग लक्षात घेऊन दिल्ली सरकारने रुग्णालयांना आवश्यक तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विलगीकरणाची व्यवस्था, H1N1 चाचण्या, औषधांचा पुरेसा साठा तसेच आपत्कालीन सेवा उपलब्ध ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आरोग्य मंत्री डॉ. पंकज सिंह यांनीही रुग्णालयांच्या तयारीचा आढावा घेतला आहे. केंद्र सरकारकडूनही आजारावरील निगराणी, चाचणी व्यवस्था आणि रुग्णालयांची तयारी अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. तज्ज्ञांच्या मते, सध्या आढळणारा H1N1 विषाणू नवीन प्रकारचा नसला तरी काही गटांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. कमकुवत रोगप्रतिकारशक्ती असलेले नागरिक, गर्भवती महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आधीपासून वैद्यकीय समस्या असलेल्या व्यक्तींनी विशेष खबरदारी घ्यावी. ताप अधिक वाढणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा गंभीर स्वरूपाची इतर लक्षणे दिसल्यास विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.