मुंबई
disha salian death case दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी (2 सप्टेंबर 2026) महत्त्वाचा आदेश दिला आहे. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी मुलीच्या मृत्यूच्या तपासात गंभीर त्रुटी झाल्याचा आरोप करत नव्याने चौकशी करून एफआयआर दाखल करण्याची मागणी केली होती. या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. अखेर आज न्यायालयाने तपास सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश दिला.
न्यायालयाच्या या निर्णयानंतर सतीश सालियन यांनी न्यायालयाचे आभार मानले आहेत. तपासाच्या अनुषंगाने न्यायालयाने, “कोणालाही आरोपी म्हणून वागणूक देऊ नये, फक्त जबाब नोंदवा. तपास करून योग्य तो निष्कर्ष काढा, मग आरोपपत्र दाखल करा,” असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणाचा पुढील तपास सीबीआयकडून केला जाणार आहे.
दिशा सालियन यांचा 8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड परिसरातील एका इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता. त्या अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या माजी मॅनेजर होत्या. दिशाच्या मृत्यूनंतर अवघ्या काही दिवसांनी, 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूत यांचाही मृत्यू झाला. या दोन्ही घटनांमध्ये काही संबंध असल्याचे विविध दावे त्यावेळी करण्यात आल्याने हे प्रकरण देशभरात चर्चेत आले होते.
मुंबई पोलिसांनी दिशा सालियन यांच्या मृत्यूप्रकरणी एक्सिडेंटल डेथ रिपोर्ट (ADR) नोंदवून तपास केला होता. पोलिसांच्या तपासानुसार हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, सतीश सालियन यांनी पोलिसांच्या या निष्कर्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आपल्या मुलीची हत्या झाल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकरणाचा नव्याने तपास करण्याची मागणी केली होती.
सतीश सालियन यांच्या याचिकेवरील disha salian death case सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने तपासाच्या पद्धतीबाबत काही गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. कुटुंबीयांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त करून गुन्ह्याची तक्रार केली असताना एफआयआर का नोंदवण्यात आला नाही, असा सवाल न्यायालयाने पोलिसांना केला होता. तसेच, ADR आणि पोस्टमॉर्टम अहवालाची प्रत इतकी वर्षे उलटूनही कुटुंबीयांना का देण्यात आली नाही, याबाबतही न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले होते.
याशिवाय, दिशा सालियन या चौदाव्या मजल्यावरून पडल्याचा पोलिसांचा दावा आणि पोस्टमॉर्टम अहवालातील जखमांची माहिती यांच्यातील सुसंगतीबाबतही न्यायालयाने स्पष्टीकरण मागितले होते. त्यामुळे या प्रकरणातील तपासाच्या पद्धतीवर न्यायालयीन सुनावणीदरम्यानच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.दरम्यान, दिशा सालियन यांच्या मृत्यूप्रकरणी आपल्याविरोधात कोणतीही तक्रार नसतानाही निव्वळ राजकीय हेतूने आपले नाव या प्रकरणात गोवले जात असल्याचा युक्तिवाद शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला होता. या प्रकरणातील सर्व पक्षकारांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने सतीश सालियन यांच्या याचिकेवरील निकाल राखून ठेवला होता. अखेर बुधवारी न्यायालयाने तपास सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश दिल्याने या बहुचर्चित प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे.