वर्धा
free-for-all-brawl येथील सार्वजनिक बांधकाम विभाग नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. बुधवार २ रोजी दुपारी विभागीय कार्यालयाच्या परिसरात शाखा अभियंता आणि शासकीय कंत्राटदार यांच्यात फ्री-स्टाईल झाल्याचे अनेकांनी उघड्या डोळ्यांनी बघितले. विशेष म्हणजे, हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले नंतर तडजोड झाल्याची माहिती आहे.

वर्धा सार्वजनिक बांधकाम विभाग गेल्या काही वर्षांपासून विविध वादांमुळे चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी एका कंत्राटदाराने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटनाही समोर आली होती. बिलांच्या देयकासाठी वरिष्ठ अधिकार्यांकडून रकमेची मागणी करतात, असा आरोप कंत्राटदारांकडून करण्यात आला होता. बुधवारीही याच मुद्यावरून वाद झाल्याची माहिती पुढे आली आहे. रस्ते दुरुस्तीच्या कामावरून विभागाचे शाखा अभियंता स्वप्नील खंडार आणि शासकीय कंत्राटदार महेंद्र ठाकूर यांच्यात दुपारी शाब्दिक खडाजंगी झाली. वाद इतका वाढला की, संतप्त झालेल्या शाखा अभियंत्याने कंत्राटदारासोबत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर कंत्राटदारानेही शाखा अभियंत्यासोबत धक्काबुक्की केली. वाद झाल्याचे लक्षात येताच तेथे उपस्थित काही कंत्राटदार आणि कर्मचार्यांनी मध्यस्थी केली. दोघांनीही एकमेकांना शिवीगाळ करत पाहून घेण्याची धमकी दिल्याने कार्यालयात काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
मारहाणीची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले. मात्र, पोलिस ठाण्यात बराच वेळ झालेल्या चर्चेनंतर दोघांमध्ये समझोता झाल्याची माहिती आहे. कार्यालयीन वेळेत शाखा अभियंता आणि कंत्राटदार यांच्यात झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यप्रणालीसह कार्यालयीन शिस्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.