हिमनदी-सरोवरांचा वाढता धोका

IIT मंडीच्या अभ्यासातून गंभीर इशारा

    दिनांक :02-Sep-2026
Total Views |
उत्तराखंड
himachal pradesh नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी आपत्तीला आठवडा उलटला असला, तरी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तसेच बेपत्ता असलेल्या नागरिकांचा शोध अद्याप सुरू आहे. हिमनदी-सरोवर फुटल्यामुळे (GLOF) उद्भवलेल्या या भीषण आपत्तीत 1,000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून, 4,000 पेक्षा अधिक लोक अद्याप बेपत्ता आहेत. या पार्श्वभूमीवर हिमालयीन प्रदेशातील हिमनदी-सरोवरांच्या वाढत्या धोक्याकडे लक्ष वेधणारी चिंताजनक माहिती IIT मंडीच्या अभ्यासातून समोर आली आहे. सुमारे 200 हिमनदी-सरोवरांचे विश्लेषण केल्यानंतर त्यापैकी 9 ते 12 सरोवरे ‘अति-धोकादायक’ श्रेणीत असल्याचे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. गेल्या दशकभरात हिमाचल प्रदेशातील अनेक हिमनदी-सरोवरांचा आकार 30 ते 60 टक्क्यांनी वाढला असून, त्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणावर जलप्रलय आणि विनाशाचा धोका निर्माण झाला आहे.
 

himachal pradesh glacial lake danger: 9 to 12 lakes at extreme risk, IIT mandi study warns 
IIT मंडीच्या ‘स्कूल ऑफ सिव्हिल अँड एन्व्हायर्न्मेंटल इंजिनिअरिंग’चे सहयोगी प्राध्यापक डेरिक पी. शुक्ला यांनी हिमालयीन प्रदेशातील वाढते पर्यटन आणि प्रदूषण हे हिमनद्यांच्या वेगाने होणाऱ्या वितळण्यामागील महत्त्वाचे घटक असल्याचे स्पष्ट केले आहे. वाहनांची वाढती ये-जा आणि मानवी हालचालींमुळे निर्माण होणारा कार्बन तसेच धूळ बर्फाच्या पृष्ठभागावर साचून त्यावर गडद थर तयार होतो. त्यामुळे सूर्यप्रकाशाचे अधिक प्रमाणात शोषण होते आणि परिणामी बर्फ वितळण्याचा वेग वाढतो.
याशिवाय, हिमालयीन भागातील ‘परमाफ्रॉस्ट’ अर्थात कायमस्वरूपी गोठलेली जमीन वितळत असल्याने भूभाग अस्थिर होत असून, दरडी कोसळण्याच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. 26 ऑगस्ट रोजी नेपाळमधील ‘ल्हेन्डे खोला’ आणि ‘भोटे कोशी’ नदीत आलेला विनाशकारी पूर हा याच घटकांचा परिणाम असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
हिमनदी-सरोवरांच्या वाढत्या धोक्याची दखल घेत ‘नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी’ने (NDMA) हिमाचल प्रदेशातील चार अत्यंत धोकादायक सरोवरांची ओळख पटवली आहे. यामध्ये घेपान, वासुकी, काशांग आणि बास्पाजवळील सरोवराचा समावेश आहे. दुसरीकडे, IIT मंडीच्या संशोधनानुसार हिमाचल प्रदेशातील 9 ते 12 सरोवरे अत्यंत चिंताजनक स्थितीत असल्याचे समोर आले आहे. विशेषतः घेपान सरोवर, योचे आणि काली कुंड या सरोवरांचा आकार दरवर्षी वाढत असल्याने या परिसरातील मानवी वस्तीला सर्वाधिक धोका असल्याचे अभ्यासातून अधोरेखित झाले आहे.
हिमालयीन प्रदेशात बोगदे आणि  himachal pradesh रस्त्यांच्या अनिर्बंध विकासकामांबरोबरच वर्षभर सुरू राहणाऱ्या पर्यटनामुळे पर्यावरणीय दबाव वाढत आहे. त्यामुळे पर्यटनावर नियंत्रण ठेवण्यासोबतच हिमनदी-सरोवरांच्या स्थितीकडे तातडीने लक्ष देणे प्रशासनासाठी अत्यावश्यक बनले आहे. नेपाळमधील अलीकडील आपत्तीने हिमनदी-सरोवर फुटीच्या संभाव्य धोक्याची तीव्रता पुन्हा एकदा अधोरेखित केली असून, हिमाचल प्रदेशातील संवेदनशील सरोवरांबाबत वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.