लाखोंचे साहित्य असलेली बॅग केली परत

प्रामाणिक ऑटोचालकाचा पोलिसांकडून गौरव

    दिनांक :02-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर

honest auto drive रस्त्यात सापडलेली तब्बल ४ लाख ७५ हजार रुपये किमतीचा ऐवज असलेली बॅग कोणताही स्वार्थ न ठेवता प्रामाणिकपणे पोलिसांच्या माध्यमातून संबंधित महिलेकडे परत करणाऱ्या ऑटोचालकाचा लकडगंज पोलिसांनी सत्कार केला. सचिन मोतीरामजी निखारे (४०, रा. विनोबा भावेनगर) असे या प्रामाणिक ऑटोचालकाचे नाव आहे.
 

honest auto drive  
व्यवसायाने शासकीय शिक्षिका असलेल्या ममता नरेश यादव ३१ ऑगस्ट रोजी लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जुना मोठा स्टँड चौक परिसरात खरेदीसाठी गेल्या होत्या. अमर टॉकीजसमोर असताना त्यांची बॅग हरवली. या बॅगेत १ लाख ७५ हजार रुपये रोख, दीड तोळ्याची सोन्याची अंगठी (अंदाजे २ लाख ५० हजार रुपये), सुमारे ५० हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि तीन एटीएम/डेबिट कार्ड होते. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ४ लाख ७५ हजार रुपये होती.
बॅग हरवल्याची तक्रार मिळाल्यानंतर लकडगंज पोलिसांनी तपास सुरू केला. दरम्यान, १ सप्टेंबर रोजी ऑटोचालक सचिन निखारे यांना सदर बॅग व त्यातील मुद्देमाल मिळून आला. त्यांनी कोणताही मोह न ठेवता बॅग थेट लकडगंज पोलिस ठाण्यात जमा केली. पोलिसांनी बॅगेतील साहित्याची खात्री करून ती ममता यादव यांच्या स्वाधीन केली. त्यामुळे यादव यांना त्यांचा सुमारे ४ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल सुरक्षितपणे परत मिळाला. ऑटोचालकाने यांनी दाखवलेला प्रामाणिकपणा, सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्यदक्षतेची दखल घेत लकडगंजचे ठाणेदार मुकुंद कवाडे यांनी ऑटोचालकाचा सत्कार करून प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. नागरिकांनीही अशाच प्रकारे प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी जपत पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन लकडगंज पोलिसांनी केले आहे.