कल्याण
kalyan court canteen कल्याण न्यायालयाच्या आवारातील कॅन्टीनमध्ये नियमांची अक्षरशः पायमल्ली होत असल्याचा धक्कादायक प्रकार अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) पाहणीत समोर आला आहे. स्वच्छतागृहाच्या टाकीवरच स्वयंपाकघर उभारून त्याच ठिकाणी सिलेंडर ठेवण्यात आले होते. तसेच, कॅन्टीनसमोरून स्वच्छतागृहातील सांडपाणी वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी, माशांचा त्रास आणि अस्वच्छ वातावरण निर्माण झाले होते. या प्रकाराची तक्रार कल्याण बार असोसिएशनने FDAकडे केली होती. तक्रारीची दखल घेत FDAने धडक कारवाई करत हे उपाहारगृह तातडीने बंद केले आहे.
कल्याण न्यायालयाच्या आवारातील कॅन्टीनमध्ये खाद्यपदार्थ तयार करताना स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे पाहणीदरम्यान आढळून आले. स्वच्छतागृहाच्या टाकीवरच स्वयंपाकघर उभारण्यात आले होते. याच ठिकाणी सिलेंडर ठेवून खाद्यपदार्थ तयार केले जात होते. कॅन्टीनसमोरून स्वच्छतागृहातील सांडपाणी वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती.
इतकेच नव्हे, तर तयार खाद्यपदार्थांवर माशा घोंघावत असल्याचेही FDAच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. धूळ आणि अस्वच्छ वातावरणातच नागरिकांना खाद्यपदार्थ दिले जात होते. या प्रकारामुळे न्यायालयाच्या आवारातील कॅन्टीनच्या स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
या अस्वच्छतेविरोधात कल्याण बार असोसिएशनने अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर FDAच्या अधिकाऱ्यांनी कॅन्टीनची पाहणी केली. या पाहणीत कॅन्टीन चालकाकडे आवश्यक परवानाही नसल्याचे समोर आले. ठाणे जिल्हा न्यायालयीन चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी चहाची टपरी चालविण्यास परवानगी देण्यात आली होती.
मात्र, या चहाच्या टपरीचा अनधिकृत विस्तार करून उपाहारगृह सुरू करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे परवानगीच्या मर्यादेबाहेर जाऊन व्यवसाय सुरू केल्याचेही या कारवाईत स्पष्ट झाले. तक्रारीची दखल घेत FDAने अखेर धडक कारवाई करत हे उपाहारगृह बंद केले.
न्यायालयाच्या आवारातच स्वच्छतागृहाच्या टाकीवर स्वयंपाकघर उभारून खाद्यपदार्थ तयार करण्यासह सांडपाणी आणि माशांचा त्रास असलेल्या अस्वच्छ वातावरणात नागरिकांना खाद्यपदार्थ दिला जात असल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. FDAच्या कारवाईमुळे या कॅन्टीनच्या अस्वच्छ कारभाराला अखेर लगाम बसला आहे.