मुंबई
manoj jarange patil मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस असून, या दरम्यान त्यांची प्रकृती खालावली आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून कार्यकर्ते अंतरवली सराटीत दाखल होत आहेत. दरम्यान, त्यांच्या समर्थनार्थ राज्यभर आंदोलनाची तीव्रता वाढताना दिसत असून नांदेडमध्ये चार तरुणांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये रास्ता रोको करण्यात आला असून, परभणीमध्ये उद्या जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला दिवसेंदिवस अधिक व्यापक स्वरूप येत असून आंदोलकही आक्रमक होत असल्याचे चित्र आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ नांदेड जिल्ह्यात चार तरुणांनी वेगवेगळ्या ठिकाणी उपोषण सुरू केले आहे. भोकर तहसील कार्यालयासमोर मराठा तरुण बालाजी पाटील कदम बटाळकर यांनी आमरण उपोषण सुरू केले असून, मागील चार दिवसांपासून ते अन्नत्याग करत आहेत. आज त्यांची प्रकृती खालावली आहे. याशिवाय नांदेड जिल्ह्यातील निवघा बाजार येथे जलकुंभावर बसून लक्ष्मण पाटील कदम आणि ओमप्रकाश पाटील कदम हे दोन तरुण आमरण उपोषण करत आहेत. तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोपान नेव्हल पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
दरम्यान, परभणी जिल्ह्यातही मराठा आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. परभणीच्या पात्री शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मराठा समाज बांधवांनी आज जोरदार रास्ता रोको आंदोलन केले. जरांगे पाटील यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, या मागणीसाठी आंदोलकांनी सुमारे दीड तास रास्ता रोको केला. तसेच आंदोलकांनी उद्या परभणी जिल्हा बंदची हाक दिली आहे. सरकारने जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा मराठा आंदोलकांनी दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण शहरातही मराठा समाज बांधव आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. याच्या निषेधार्थ पैठण शहरातील सह्याद्री नाका चौकात मराठा आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा देत आंदोलकांनी सरकारचा निषेध नोंदवला.
धाराशिव जिल्ह्यातही manoj jarange patil जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याच्या पार्श्वभूमीवर धाराशिव–औसा रोडवरील चिखली फाटा येथे सकल मराठा बांधवांनी टायर पेटवून रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या देत जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.जालन्यातही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखून धरत जोरदार आंदोलन केले. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत झालेली घसरण आणि सरकारकडून मागण्यांबाबत अद्याप ठोस निर्णय न झाल्याने राज्यातील विविध भागांत आंदोलनाची धग वाढत असून, आगामी काळात या आंदोलनाची दिशा काय राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.