जालना
manoj jarange patil मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंतरवाली सराटी येथे सुरू असलेले उपोषण आज पाचव्या दिवशीही कायम आहे. उपोषणामुळे जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असताना सरकारकडून त्यांची समजूत काढण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, जरांगे आपल्या मागणीवर ठाम असून, १२ सप्टेंबर रोजी मुंबईकडे रवाना होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. मराठा समाजातील तरुणांनीही हळूहळू मुंबईच्या दिशेने रवाना व्हावे, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्याचवेळी आझाद मैदानावर कोणीही जाऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू झाल्यानंतर सरकारच्या हालचालींना वेग आला आहे. सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा झाल्यानंतर अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानेही मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. जालन्याच्या पोलिस अधीक्षकांसह जिल्हाधिकारी आशिमा मित्तल जरांगे यांच्या भेटीसाठी आंतरवाली सराटीत पोहोचल्या. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी सरकारकडून आतापर्यंत नेमके कोणते प्रयत्न करण्यात आले आहेत, याची माहिती देत जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
मात्र, सरकारची बाजू मांडली जात असल्याचे जरांगे यांना मान्य झाले नाही. चर्चेदरम्यान त्यांनी आशिमा मित्तल यांना, ‘तुम्ही सरकारची बाजू घ्यायला इथे आला आहात का?’ असा सवाल केला. त्यावर मित्तल यांनी, ‘ते माझे काम आहे,’ असे उत्तर दिले. त्यानंतर सरकारवर टीका करताना जरांगे यांनी, ‘सरकारमुळे चांगल्या चांगल्यांना फाशी घेण्याची वेळ आली,’ असे वक्तव्य केले.
दरम्यान, जरांगे पाटील सरकारवर टीका करत असताना त्यांचा रोख आपल्याकडे असल्याचा गैरसमज आशिमा मित्तल यांचा झाल्याचे दिसून आले. त्यांनी थेट, ‘मनोजजी, नोकरी करताना फाशी घेण्याची वेळ आली तरीही माझी तयारी आहे,’ असे म्हटले. मित्तल यांचे हे वक्तव्य ऐकताच आंतरवाली सराटीतील वातावरण काही काळ शांत झाले. मित्तल पुढे बोलत असतानाच जरांगे यांनी त्यांना थांबवत आपली भूमिका स्पष्ट केली.
‘तुम्ही जिल्हाधिकारी आहात… तुम्ही फाशी घेण्याची भाषा बोलू नका. एक प्रश्न सोडवता आला नाही म्हणून तुमच्यावर टीका होईल. मी काय बोलतोय हे तुमच्या लक्षात येतंय का? तुम्ही कशाला या भानगडीत पडत आहात,’ असे जरांगे यांनी मित्तल यांना सांगितले.
यावेळी जरांगे यांनी आशिमा manoj jarange patil मित्तल यांच्या शिक्षणाचा आणि त्यांच्या प्रशासकीय प्रवासाचा उल्लेख करत त्यांना धीर देण्याचाही प्रयत्न केला. ‘अभ्यास करून तुम्ही मोठी झालेली लेकरं आहात. सरकारमध्ये चौथी नापास लोक मंत्री आहेत. ते लोक तुम्हाला शिकवून इकडे पाठवत आहेत. तुम्ही रात्रंदिवस अभ्यास करून इथपर्यंत पोहोचले आहात. तुमची यूपीएससी आणि एमपीएससीची पुस्तके यांना वाचता येणार नाहीत,’ अशा शब्दांत त्यांनी सरकारमधील मंत्र्यांवर टीका केली.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेले उपोषण पाचव्या दिवशीही सुरूच असून, जरांगे पाटील यांनी आपली भूमिका कायम ठेवली आहे. सरकारकडून चर्चा आणि समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असतानाच १२ सप्टेंबरला मुंबईकडे जाण्याची घोषणा केल्याने पुढील काळात आंदोलनाची दिशा काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.