मुंबई,
mpsc paper slip test speed राज्यात चर्चेत आलेल्या MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणातील तपासाला आता वेग आला आहे. गुन्हे शाखेने यापूर्वी तीन अधिकाऱ्यांसह 7 जणांना अटक केली होती. त्यानंतर नंदुरबार येथून ऋतुजा पाटील हिलाही पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केल्यानंतर अटक केली. तिला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली, तर उर्वरित आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.या प्रकरणातील सर्व 7 आरोपींना सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. पोलिसांनी आरोपींच्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. सुनावणीदरम्यान ऋतुजा पाटील न्यायालयात भावूक झाल्याचे दिसून आले. दरम्यान, MPSC अधिकारी विश्वेश्वर नकाते याने या प्रकरणात वापरलेला लॅपटॉप खाडीत फेकल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने हा लॅपटॉप खाडीत टाकण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे. याच लॅपटॉपमध्ये नकातेने तब्बल 294 प्रश्न आणि त्यांचे पर्याय नोंदवले असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.

पोलिसांनी खाडीत फेकण्यात आलेला लॅपटॉप शोधून काढला असून, त्यातील डेटा पुन्हा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय नंदुरबारमधील कौटिल्या क्लासेसचे संचालक आणि आरोपी प्रवीण पाटील यांच्या घरातून आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रेही पोलिसांच्या हाती लागली आहेत. या प्रकरणातील आणखी काही तपास बाकी असल्याने आरोपींची अधिक चौकशी आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. आरोपी तपासात सहकार्य करत नसून उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा दावाही पोलिसांकडून करण्यात आला. आरोपी आणि ऋतुजा पाटील यांची समोरासमोर चौकशी करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आरोपींच्या वतीने बाजू मांडणारे वकील सत्यराम गौड यांनी पोलिसांकडून 7 दिवसांची कोठडी मागण्यात आल्याची माहिती दिली. विश्वेश्वर नकाते यांचा लॅपटॉप नष्ट झाल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला. परीक्षेत नेमका कोणता प्रश्न येणार आहे, याची कोणालाही माहिती नव्हती, असा युक्तिवाद त्यांनी केला. मात्र, न्यायालयाने आरोपींना आणखी 5 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. गौरवने यापूर्वी प्राथमिक माहिती दिली होती, असा युक्तिवाद त्याच्या वकिलांकडून करण्यात आला. ऋतुजा पाटीलने गौरवला प्रश्न पाठवले होते. 20 तारखेला त्याला प्रश्नसंच मिळाला होता; मात्र तो MPSCचा प्रश्नसंच असल्याची माहिती ऋतुजाला नव्हती, असा दावा गौरवच्या वकिलांनी न्यायालयात केला.