धंतोलीतील वाहतुकीच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढा

अधिसूचनेची अंमलबजावणी करायलाच पाहिजे : वाहतूक उपायुक्ताला मागितला अहवाल

    दिनांक :02-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
traffic धंतोली, रामदासपेठमधील हॉस्पिटल्स, अतिक्रमण, वाहतुकीच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढावा. तसेच वाहतूक पोलिसांनी काढलेल्या अधिसूचनेची आपण अंमलबजावणी करायलाच पाहिजे. परंतु वारंवार अशी परिस्थिती का उद्भवत आहे. सप्टेंबर महिना सण उत्सवाचा असल्यामुळे नोटीफिकेशनची अंमलबजावणी करताना काळजी घ्यावी, असे मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी मौखिकपणे म्हटले आहे.
 

nagpur high court seeks report on permanent traffic solution in dhantoli, ramdaspeth 
वाहतूक पोलिस उपायुक्तांनी सकारात्मक पावले उचलून योग्य कारवाई करावी तसेच धंतोली, रामदासपेठमधील वाहतूकीच्या प्रश्नांसाठी कायमस्वरूपी तोडगा काढून नोटीफिकेशनची अंमलबजावणी करावी, यासंदर्भात दोन आठवड्यात वाहतूक पोलिस उपायुक्तांनी अहवाल सादर करावा, असे आदेश न्यायमूर्ती उर्मिला जोशी फाळके आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांनी दिले. डीसीपींना कारणे दाखवा नोटीस बजावूनही पावले उचलली नाही?. नोटीफिकेशनचे पालन का केले नाही?. अंमलबजावणी केल्याचा अहवाल सादर करावा, असेही हायकोर्टाने म्हटले आहे. धंतोलीत मल्टीपल पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्याची गरजही न्यायमूर्ती उर्मिला जोशी यांनी बोलून दाखविली. मागील सुनावणीत न्यायालयाने डीसीपीला प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले होते. पोलिस उपायुक्त आदित्य मिरखेलकर सुनावणीदरम्यान हजर होते.
 
 
धंतोली नागरिक मंडळाच्यावतीने traffic धंतोली, रामदासपेठमधील अतिक्रमण, वाहतुकीचा प्रश्न याबाबत दाखल जनहित याचिकेवर हायकोर्टात याचिका प्रलंबित आहे. मनपा आयुक्त आणि वाहतूक पोलीस उपायुक्त यांनी जुन्या हायकोर्टाच्या आदेशांचे व अधिसूचनेचे पालन केले नाही, असे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी निदर्शनास आणून दिले. धंतोली नागरिक मंडळातर्फे अ‍ॅड. आशुतोष धर्माधिकारी, अ‍ॅड. अश्विन देशपांडे, मनपातर्फे अ‍ॅड. जेमिनी कासट, सरकारतर्फे अ‍ॅड. दीपक ठाकरे यांनी बाजू मांडली.
अधिसूचनेनुसार प्रमुख रस्ते 'नो-पार्किंग झोन' घोषित
धंतोली परिसरात वाहतूक रचनेत बदल करण्यात आले असून नवी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सह पोलिस आयुक्त अश्वती दोर्जे यांनी हे आदेश जारी केले होते. याच अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यास न्यायालयाने म्हटले आहे.
 
 
प्रमुख एकेरी मार्ग
 
सिहो हॉस्पिटल ते सराफा कोर्ट : सिहो हॉस्पिटलकडून सराफा कोर्टकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतुकीस प्रवेशबंदी करण्यात आली आहे. आता केवळ सराफा कोर्टकडून सिहो हॉस्पिटलकडे जाणारा मार्ग एकेरी वाहतुकीसाठी खुला राहील. सिल्व्हर पॅलेसकडून वरंभे हॉस्पिटलकडे जाणाऱ्या वाहनांना बंदी असून, वरंभे हॉस्पिटलकडून सिल्व्हर पॅलेसकडे जाणारी वाहतूक सुरू राहील. अमरज्योती कॉम्प्लेक्सकडून कुंभरे ज्वेलर्सकडे जाण्यास बंदी असून, कुंभरे ज्वेलर्सकडून अमरज्योती कॉम्प्लेक्सकडे जाणारा मार्ग एकेरी वाहतुकीसाठी खुला असेल.
नो-पार्किंग आणि नवीन पार्किंग व्यवस्था
नागरिक व रुग्णांच्या सोयीसाठी अनेक प्रमुख मार्गांवर दोन्ही बाजूंना 'नो-पार्किंग' लागू करण्यात आले आहे. कुंभरे ज्वेलर्स ते गोरक्षण कम्पाऊंड, सिल्व्हर पॅलेस ते वरंभे हॉस्पिटल, भारुका भवन ते डॉ. पेंडसे हॉस्पिटल कॉर्नर, एच.पी. पेट्रोल पंप ते काँग्रेसनगर टी-पॉइंट आणि न्यूरॉन हॉस्पिटल ते जनता चौक या मार्गांच्या दोन्ही बाजूंना सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नो-पार्किंग घोषित करण्यात आले आहे. न्यूरॉन हॉस्पिटल ते भगवतदर्शन बिल्डिंग (५० मीटरपर्यंत) आणि मिश्रा हाऊस ते टिळक विद्यालय (५० मीटरपर्यंत) नो-पार्किंग राहील. विशेष पार्किंग व्यवस्था: धंतोली गार्डनच्या उत्तर, दक्षिण व पश्चिम बाजूला चारचाकी वाहनांसाठी सिंगल लेन पार्किंग सुविधा असेल. मेहाडिया चौक ते होमगार्ड कार्यालयादरम्यान गार्डनच्या पूर्व बाजूने दुचाकींसाठी सिंगल लेन पार्किंगची सोय करण्यात आली आहे.