हॉटेलमध्ये माझ्यासोबत वेळ घालव" असे म्हणून महिलेला विचित्र मागणी

तर औषध व्यावसायिकाची महिलेने खंडणी मागितल्याची तक्रार

    दिनांक :02-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
harassment झोपेचे औषध देण्यास नकार देणाऱ्या औषध व्यावसायिकाला महिलेने खोट्या विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत अडीच लाख रुपयांची खंडणी मागितली. या प्रकरणात पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला. दरम्यान महिलेनेही दिलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी औषध व्यावसायिकाने महिलेला हॉटेलमध्ये माझ्यासोबत वेळ घालव, असे म्हणून विनयभंग केल्याचा गुन्हा नोंदवला.
 

nagpur woman and pharmacist file counter complaints over alleged extortion and harassment 
मानकापूर पोलिस हद्दीत मंगळवारी हा प्रकार पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला. मानकापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश वर्मा यांचे औषध विक्रीचे दुकान आहे. त्यांची शबनम (काल्पनिक नाव) या महिलेशी जुनी ओळख होती. शबनम ही नेहमी वर्मा यांच्या औषध दुकानातून औषध खरेदी करायची. यावरून ती नेहमी उधार औषध मागायची. वेळोवेळी उसने पैसे अथवा व्याजाने पैसे देण्याची मागणी करत होती. दरम्यान काही दिवसांपूर्वी तिने वर्मा यांच्याकडे झोपेचे औषध मागितले. त्यावर वर्मा यांनी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय हे औषध देता येत नाही, असे स्पष्ट शब्दांत शबनमला सांगितले. त्यावरून शबनम हिने खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत अडीच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे वर्मा यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.
शबनमने वर्मा याच्या विरोधात दिलेल्या तक्रारीनुसार, आकाशने आपल्याकडून रोख अडीच लाख रुपये घेतले होते. ते परत मागितले असता त्याने पैसे देण्यास नकार दिला. पैशाच्या बदल्यात त्याने आपल्याला हॉटेलमध्ये माझ्यासोबत वेळ घालव अथवा दुसऱ्या महिलेची व्यवस्था कर अशी अट घातली. ती आपण नाकारल्याच्या आशयाची तक्रार शबनमने मानकापूर पोलिसांकडे केली. या परस्पर विरोधी तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी दोघांवरही वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हे दाखल केले.