सर्व्हर डाऊन काढा पुर्ण तिकीट.. वाहक व प्रवाशांमध्ये वाद!

एनसीएमसी कार्डची सक्ती

    दिनांक :02-Sep-2026
Total Views |
हिंगणघाट
ncmc card  बारा तासांपूर्वी तातडीचा आदेश काढून १ सप्टेंबरपासून परिवहन मंडळाला महिला सन्मान योजनेअंतर्गत महिला तसेच ज्येष्ठ नागरिक सवलतधारक प्रवाशांना एनसीएमसी कार्डद्वारे तिकीट देण्याच्या सूचना प्राप्त झाल्या. मात्र, सर्व्हर डाऊनमुळे ज्येष्ठ नागरिक व महिलांवर पूर्ण तिकीट काढण्याची वेळ येत असल्यामुळे प्रवासी व वाहकांमध्ये वाद होऊ लागले आहेत.
 

ncmc card  
वाहक विनासवलत प्रवाश्यांना तिकीट देणे, शालेय विद्यार्थी पासधारकांची प्रक्रिया करणे, रोख रक्कम स्विकारून तिकीट देणे आदी सर्व जबाबदार्या पार पाडत असतो. त्यात आता महिला सन्मान योजना व ज्येष्ठ नागरिक सवलतधारक प्रवाशांसाठी एनसीएमसी कार्ड स्कॅन करूनच तिकीट देण्याची अतिरिक्त जबाबदारी वाहकांवर आलेली आहे. परंतु, एनसीएमसी कार्डमध्ये आवश्यक रिचार्ज झालेले नसल्याने वाहकांना नियमानुसार पूर्ण दराचे तिकीट घेण्याची वेळ आली आहे. कार्ड रिचार्ज करण्याची व्यवस्था वाहकाकडे असली तरीही एनसीएमसी ncmc card  कार्ड लागू करण्याच्या पहिल्याच दिवशी वाहकांकडे असलेली रिचार्ज करण्याची यंत्रणा सर्व्हर डाऊनमुळे कोलमडलेली असल्याने वाहकाला नाईलाजाने पूर्ण तिकीट द्यावे लागत आहे. त्यामुळे बसमध्ये वाहक व प्रवाशांमध्ये वादावादी, गैरसमज आणि अनावश्यक तणाव निर्माण होत आहे. कार्ड रिचार्ज करण्यासाठी महामंडळाने प्रत्येक बसस्थानकावर स्वतंत्र एनसीएमसी कर्मचारी नियुक्त करावा, अशी मागणी होत आहे.
एनसीएमसी कार्ड काढणे, रिचार्ज करणे व कार्ड वापराबाबत प्रवाशांना मार्गदर्शन करण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी. एनसीएमसी प्रणाली पूर्णपणे सुरळीत होईपर्यंत वाहकांवर कोणतीही अनावश्यक जबाबदारी अथवा कारवाई लादू नये, एनसीएमसी कार्ड वापराची बसस्थानकांवर जनजागृती करून माहिती द्यावी, अशी मागणी दोस्ती कर्मचारी संघटनेचे विभागीय सचिव शमी पठाण यांनी केली आहे.