पीएनबी करन्सी चेस्टमध्ये १७ कोटींच्या बनावट नोटांचा घोटाळा!

    दिनांक :02-Sep-2026
Total Views |
लखनौ,
Nota made in PNB currency chest येथील सहारनपूर सोफिया मार्केटमधील पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) करन्सी चेस्टमध्ये तब्बल १७ कोटी रुपयांच्या बनावट नोटा आढळल्याने बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसा या महाघोटाळ्याचा धक्कादायक पॅटर्न समोर येत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) चेस्टमध्ये पाठवलेल्या नव्या कोऱ्या नोटांची थेट फोटोकॉपी काढून आणि त्या छापून हुबेहूब बनावट नोटा तयार केल्या जात असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या बनावट नोटा चेस्टमध्ये खऱ्या नोटांसोबत ठेवून, तिथल्या खऱ्या नोटा बाहेर काढून त्यांची विल्हेवाट लावली जात होती, ज्यामुळे संपूर्ण बँकिंग प्रणालीच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
 
 
 
a23545
 
 
या संपूर्ण फसवणुकीच्या मुळाशी जाण्यासाठी पीएनबी नवी दिल्ली मुख्यालयातील १६ अधिकाऱ्यांचे विशेष पथक सहारनपूरमध्ये तळ ठोकून तपास करत आहे. बनावट नोटा तयार करण्याचे रॅकेट नक्की कसे चालवले जायचे, त्या चेस्टपर्यंत कशा पोहोचवल्या जायच्या आणि खऱ्या नोटा चेस्टमधून केव्हा व कशा गायब केल्या गेल्या, या मुख्य मुद्द्यांवर हे पथक लक्ष केंद्रित करत आहे. सोफिया मार्केटमधील या शाखेत चालणारा हा प्रकार किती काळापासून सुरू होता आणि त्यात बँकेच्या आतल्या कर्मचाऱ्यांचा कितपत सहभाग होता, याचा कसून शोध घेतला जात आहे.
 
 
बँक प्रशासन आणि तपास यंत्रणांनी या प्रकरणात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. करन्सी चेस्टशी संबंधित दोन अंतर्गत कर्मचारी आणि दोन बाह्य कर्मचाऱ्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. तसेच संशयास्पद भूमिका आढळलेल्या इतर अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी केली जात आहे. तपासाची व्याप्ती वाढल्यानंतर या घोटाळ्यात सहभागी असलेल्या आरोपींची संख्या आणखी वाढण्याची स्पष्ट शक्यता पीएनबी अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.