बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस; रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य

हॉटमिक्स विभागात बदली सत्र, एका दिवसात दोनदा प्रभार बदलल्याने काम ठप्प

    दिनांक :02-Sep-2026
Total Views |

 

नागपूर
roads-ganapati  बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस उरले असताना नागपूरच्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. शहरातील खड्ड्यांवरून मनपावर चौफेर टीका होत असताना हॉटमिक्स विभागात एका दिवसात दोनदा प्रभार बदलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त होतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
 
road
कार्यकारी अभियंता नरेश शिंगनजोडे यांच्याकडून केवळ तीन महिन्यांत हॉटमिक्स विभागाचा प्रभार काढून २७ ऑगस्ट रोजी एसआरएच्या कार्यकारी अभियंता अश्विनी यलचटवार यांच्याकडे देण्यात आला. मात्र २४ तासांतच प्रशासनाला जाग आली आणि २८ ऑगस्ट रोजी नवा आदेश काढून यलचटवार यांच्याकडूनही प्रभार काढून घेत लक्ष्मीनगर झोनचे कार्यकारी अभियंता रवींद्र बुंधाडे यांच्याकडे देण्यात आला. बुंधाडे यांच्याकडे आधीच परिवहन विभागाचा अतिरिक्त प्रभार आहे. म्हणजे एका अधिकाऱ्यांवर दोन विभागांचा भार आहे.

यापूर्वी साडेचार वर्षे अजय डहाके यांच्याकडे हा विभाग होता, तेव्हा कामाला गती होती. आता दर तीन महिन्यांनी प्रमुख बदलला जात असल्याने कोणीही जबाबदारी घेताना दिसत नाही.


केवळ बुजविले १४८

विभागात सतत बदल होत असल्याचा थेट फटका गणेशोत्सवाच्या तयारीला बसला आहे. जुलै महिन्यात विविध झोनमधून हॉटमिक्स विभागाकडे १२८२ खड्डे बुजविण्याची मागणी आली होती. प्रत्यक्षात ऑगस्ट महिन्यात केवळ १४८ खड्डे बुजविण्यात आले. म्हणजे ८८ टक्के खड्डे जैसे थेच आहेत.

 
गणेशोत्सवात शहरातील अनेक रस्त्यांवरून बाप्पाच्या मिरवणुका निघतात. सध्या सीताबर्डी, धरमपेठ, लक्ष्मीनगर, हनुमान नगर, सतरंजीपुरा भागातील मुख्य रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे त्यात पाणी साचत असून दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. गणेशभक्तांना याच खड्ड्यांतून मिरवणुकीचा मार्ग काढावा लागणार आहे.
 
सहा चमूंची योजना केवळ कागदावर
गणेशोत्सवाच्या पृष्ठभूमीवर सहा चमूंच्या मदतीने खड्डे बुजविण्याची योजना आखल्याचा दावा केला आहे. पण जेव्हा विभागालाच प्रमुख नाही, तेव्हा या चमू काम करणार कशा, असा प्रश्न आहे. प्रत्यक्षात हॉटमिक्स प्लाण्टमधून साहित्य निघत नसल्याचे चित्र आहे.