नवी दिल्ली,
Pakistan posted Modi's photo शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेदरम्यान काढण्यात आलेल्या नेत्यांच्या ग्रुप फोटोवरून भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाच्या ‘एक्स’ हँडलवरून मंगळवारी शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान आणि इतर काही नेत्यांना बाजूला करण्यात आल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे भारतात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाकिस्तानवर जोरदार निशाणा साधला आहे. किर्गिझस्तानमधील बिश्केक येथे झालेल्या SCO शिखर परिषदेदरम्यान जागतिक नेत्यांचा हा ग्रुप फोटो काढण्यात आला होता. पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने पोस्ट केलेल्या छायाचित्राच्या दोन्ही बाजू कापण्यात आल्या होत्या. त्यामुळे नरेंद्र मोदी, मसूद पेझेश्कियान यांच्यासह काही नेते त्या छायाचित्रातून गायब झाले होते. मात्र, या पोस्टनंतर काही तासांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी हाच मूळ फोटो आपल्या सोशल मीडिया खात्यावरून शेअर केला. या छायाचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व नेते स्पष्टपणे दिसत होते.
या प्रकारावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी पाकिस्तानच्या कृतीला अत्यंत दुर्दैवी संबोधले. पाकिस्तानकडून अशा प्रकारच्या कृती वारंवार केल्या जात असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, नरेंद्र मोदी यांनी इच्छा केली असती तर पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून पुसून टाकण्याची क्षमता असल्याचे वक्तव्य शिंदे यांनी केले. ऑपरेशन सिंदूरचा संदर्भ देत पाकिस्तानने भारतासोबत अशा प्रकारचे खेळ करण्याचा प्रयत्न करू नये, असा इशाराही त्यांनी दिला.एका फोटोमधून मोदींचे छायाचित्र काढले म्हणून ते १.४ अब्ज भारतीयांच्या मनातून पुसले जाऊ शकत नाहीत, असेही शिंदे म्हणाले. नरेंद्र मोदी हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांपैकी एक असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान, माजी परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे. अकबर यांनीही या घटनेवर पाकिस्तानवर टीका केली. पाकिस्तानचे हे कृत्य बालिश असून, अशा प्रकारच्या कृतींमुळे आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर पाकिस्तानचीच खिल्ली उडत असल्याचे त्यांनी म्हटले. फोटोमध्ये मोदींना जणू ते तिथे उपस्थितच नव्हते अशा पद्धतीने काढण्यात आले, तर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना मध्यभागी ठेवण्यात आले आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना बाजूला करण्यात आल्याचे अकबर यांनी नमूद केले. अकबर यांच्या मते, आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये अशा प्रकारे छायाचित्रे बदलणे हे पाकिस्तानच्या खोलवर रुजलेल्या न्यूनगंडाचे द्योतक आहे. अशा अतिरेकी भूमिकेचे रूपांतर अनेकदा हास्यास्पद वर्तनात आणि त्यानंतर दहशतवादासारख्या गंभीर कृत्यांमध्ये होत असल्याची टीकाही त्यांनी केली.