देसाईगंज
sanitation-campaign अतिदुर्गम, आदिवासीबहुल नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा या गावाने सरपंच अपर्णा राऊत व उपसरपंच गजानन सेलोटे यांच्या नेतृत्वात राबविलेल्या स्वच्छता अभियानाची शासकीय स्तरावरुन दखल घेऊन संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या विभागीय स्तरीय तिसर्या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
गडचिरोली जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या कोंढाळा या ग्रामपंचायतीने राबविलेल्या स्वच्छता अभियानाची शासन निर्णयाच्या अनुषंगाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन 2025-26 अंतर्गत जिल्हास्तरीय समितीने निवड केलेल्या ग्रामपंचायतीची विभागस्तरीय निवड समितीकडून पडताळणी करण्यात आली होती. त्यानुसार विभागीय आयुक्त यांनी विभागस्तरीय तपासणी समितीस मंजुरी प्रदान केलेली आहे.
सदर समितीने जिल्हास्तरीय समितीने शिफारस केलेल्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त ग्रामपंचायतींची प्रत्यक्ष भेट देऊन पडताळणी केली आहे. सदर विभागस्तरीय तपासणी समितीने मुद्देनिहाय माहिती व कागदपत्राच्या आधारे प्रत्यक्ष पाहणी करून तसेच संबंधित सर्व ग्रामपंचायती, अंगणवाडी व शाळा यांना भेटी देऊन पात्र ग्रामपंचायतीची पडताळणी करून त्या अनुषंगाने नागपूर जिल्हा परिषद, कामठी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत तरोडी या ग्रामपंचायतला प्रथम पुरस्कार तर चंद्रपुर जिल्हा परिषद अंतर्गत ब्रम्हपुरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत वांद्राला द्वितीय तर गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या कोंढाळा ग्रामपंचायतीला तीसर्या क्रमांकाचे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे नागपूर विभागाच्या अप्पर आयुक्त (विकास) वर्षा गौरकर यांनी कळविले आहे.