चेन्नई
Smartphones banned in Tamil Nadu temples तामिळनाडू सरकारने राज्यातील 52 प्रमुख मंदिरांमध्ये स्मार्टफोनच्या वापरावर बंदी घातली आहे. हा नियम लागू सुद्धा झाला आहे. नवीन नियमानुसार, भाविकांना मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी त्यांचे स्मार्टफोन काउंटरवर जमा करावे लागतील. प्रत्येक फोनसाठी 5 रुपये शुल्क आकारले जाईल. कॅमेरा नसलेले मोबाईल फोन मंदिरात नेण्यास परवानगी असेल. मंदिराच्या आवारात फोटो काढणे, रील बनवणे आणि व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास मनाई आहे. या नियमानुसार, व्हीआयपी, सेलिब्रिटी आणि प्रसिद्ध व्यक्तींचे फोटो किंवा व्हिडिओ काढण्यासही परवानगी दिली जाणार नाही. हिंदू धार्मिक आणि धर्मादाय मंत्री (एचआर अँड सीई) रमेश यांनी ही माहिती दिली.

हा निर्णय 2 डिसेंबर 2022 रोजी मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने दिलेल्या आदेशाच्या आधारे जारी करण्यात आला. भाविक, विशेषतः तरुण, मंदिराच्या आवारात फोटो काढणे, रील बनवणे आणि व्हिडिओ रेकॉर्ड करत असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली होती. मंत्र्यांनी सांगितले की, कॅमेरा नसलेले मोबाईल फोन मंदिरात नेण्यास परवानगी असेल. मंदिरांची पवित्रता आणि शांततापूर्ण वातावरण टिकवून ठेवणे हा या नवीन नियमाचा उद्देश आहे. कांचीपुरम येथील प्रसिद्ध देवराजस्वामी-अथी वरदर मंदिरात मंगळवारी सकाळी 6 वाजता ही व्यवस्था लागू करण्यात आली. फोन गोळा करण्यासाठी दोन संगणक ऑपरेटर आणि दोन कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. एका जनहित याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने हा आदेश जारी केला.
तिरुचेंदूर येथील अरुलमिगु सुब्रमण्य स्वामी मंदिरात स्मार्टफोनच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने हा आदेश जारी केला. यापूर्वी, मंदिरांना मोबाईल फोनवर बंदी घालण्याचे आणि त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले होते. हाच नियम व्हीआयपींनाही लागू होतो. मंदिराच्या प्रवेशद्वारावर आणि मंदिराच्या आवाराबाहेर मोबाईल फोनच्या वापरावर बंदी असल्याची माहिती देणारे फलक लावण्याचे निर्देश मंदिर अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच, ध्वनीक्षेपकाद्वारे (लाऊडस्पीकर) या नियमाबद्दल भक्तांना माहिती देण्याचे निर्देशही त्यांना देण्यात आले आहेत. एचआर अँड सीई विभागाने मंदिर परिसरात देवतांचे फोटो काढण्यावर, व्हिडिओ बनवण्यावर आणि धार्मिक विधींचे चित्रीकरण करण्यावरही बंदी घातली आहे.