सणासुदीत साखरेच्या दरांना लगाम

व्यापाऱ्यांच्या साठा मर्यादेत निम्मी कपात

    दिनांक :02-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली
sugar prices ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला बसणारी महागाईची झळ कमी करण्यासाठी केंद्र सरकारने साखरेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. साखरेची साठेबाजी आणि सट्टेबाजी रोखण्यासाठी सरकारने व्यापाऱ्यांना साखर साठवण्याची परवानगी असलेली मर्यादा थेट निम्म्याने कमी केली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत केंद्र सरकारने घेतलेल्या विविध उपाययोजनांमुळे गगनाला भिडलेले साखरेचे दर आता मोठ्या प्रमाणात खाली आले आहेत.
 
 
sugar prices fall ahead of festive season as government halves traders’ stock limit
केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या आदेशानुसार, १५ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत व्यापाऱ्यांना एकावेळी जास्तीत जास्त २,००० क्विंटल साखरेचा साठा करता येणार आहे. यापूर्वी १ ऑगस्टपासून ही मर्यादा ४,००० क्विंटल इतकी निश्चित करण्यात आली होती. मात्र, सणांच्या काळात कृत्रिम तुटवडा निर्माण करून साखरेच्या दरात वाढ करण्याचा प्रयत्न करणाऱ्या साठेबाजांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने आता ही मर्यादा निम्म्यावर आणली आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने sugar prices  सप्टेंबर महिन्यासाठी देशांतर्गत बाजारात तब्बल १३ लाख टन साखरेचा अतिरिक्त कोटा मंजूर केला आहे. त्याचा परिणाम बाजारात दिसून येत असून, नवी मुंबईतील घाऊक बाजारात साखरेचे दर आता प्रति किलो ४९ ते ५१ रुपयांपर्यंत खाली आले आहेत. घाऊक बाजारातील साखरेच्या दरात किलोमागे तब्बल ९ ते ११ रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
किरकोळ बाजारात मात्र सध्या साखर ६५ ते ७० रुपये किलो दराने विकली जात आहे. घाऊक बाजारातील दरातील ही घसरण कायम राहिल्यास किरकोळ बाजारातही साखरेचे भाव आणखी कमी होण्याची शक्यता आहे. ‘द बॉम्बे शुगर मर्चंट असोसिएशन’चे अध्यक्ष अशोक जैन यांनी एका वृत्तसंस्थेला ही माहिती दिली.
गेल्या महिन्यात साखरेच्या दरात तब्बल ४० टक्क्यांनी वाढ झाली होती. मात्र, केंद्र सरकारने घेतलेल्या कठोर पावलांनंतर साखर कारखान्यांमधील दर आता २० टक्क्यांपर्यंत खाली आले आहेत. त्यामुळे साठेबाजीवर नियंत्रण आणि अतिरिक्त कोट्याच्या निर्णयामुळे साखरेच्या बाजारभावाला लगाम बसला असून, आगामी सणासुदीत ग्राहकांना त्याचा आणखी फायदा मिळण्याची शक्यता आहे.