बालसुधारगृहातून पळालेल्या चारपैकी तिघे ताब्यात

    दिनांक :02-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
kapilnagar police action पाटणकर चौकातील शासकीय बालसुधारगृहातून रविवारी मध्यरात्री दीड वाजता पळून गेलेल्या चार अल्पवयीन मुलांपैकी पोलिसांनी तिघांचा शोध लावला आहे. हुडकेश्वर परिसरातून दोन मुलांना सोमवारीच ताब्यात घेण्यात आले होते, तर तिसऱ्या मुलाला मंगळवारी सकाळी पुण्यातून शोध घेऊन त्याला नागपुरात आणण्यात आले. आता चौथ्या अल्पवयीनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके तैनात करण्यात आली.
 
 zsvsxd
 
पोलिसांच्या माहितीनुसार, एक मुलगा हुडकेश्वर परिसरातील घरफोडीच्या प्रकरणातील आरोपी असून त्याला २८ जुलै रोजी बालसुधारगृहात दाखल करण्यात आले होते. दुसरा कामठी येथील हत्या प्रकरणातील आरोपी असून त्याला ६ मार्च रोजी निरीक्षणगृहात दाखल करण्यात आले होते. तिसऱ्याला १५ ऑगस्टला, तर चौथ्याला शस्त्र कायद्याशी संबंधित प्रकरणात ७ ऑगस्ट रोजी बालसुधारगृहात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक तपासात चारही मुलांनी पूर्वनियोजित पद्धतीने पलायनाची योजना आखली होती. त्यांनी बालसुधारगृहातील स्वच्छतागृहाच्या व्हेंटिलेटरची खिडकी तोडून त्यातून बाहेर पडत पलायन केले. सोमवारी पहाटे किशोर बेपत्ता असल्याचे लक्षात आल्यानंतर बालसुधारगृहातील कर्मचाऱ्यांनी कपिलनगर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून शोधमोहीम सुरू केली. तांत्रिक तपास आणि पोलिसांनी कारवाई करत हुडकेश्वर परिसरातून दोन मुलांना शोधून काढले. तिसरा मुलगा पुण्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला मंगळवारी सकाळी त्याला नागपुरात आणले. कपिलनगरचे ठाणेदार सतीश आडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत चारपैकी तीन अल्पवयीनांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. चौथ्या मुलाचा शोध सुरू असून त्याला लवकरच ताब्यात घेण्यात येणार आहे. दरम्यान, या घटनेमागील परिस्थिती तसेच बालसुधारगृहातील सुरक्षा व्यवस्थेचीही पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.
आधीही अल्पवयीन मुलांचे पलायन
कपिलनगर येथील या बालसुधारगृहातून अल्पवयीनांच्या पलायनाची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही येथील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, २०१४ मध्ये सुमारे ३० मुले एकाच वेळी पळून गेली होती.२०१९ मध्ये १४ मुले पळून गेली होती. त्यापैकी तीन मुले त्याच दिवशी रेल्वे स्थानकावर आढळून आली होती. याशिवाय २०१८ मध्ये चार आणि २०२३ मध्ये मुले पळून गेल्याची घटना घडली होती.