वाघाच्या हल्यात महिलेचा मृत्यू

सुरक्षेतील हलगर्जीपणाचा संशय

    दिनांक :02-Sep-2026
Total Views |
राजस्थान 
tiger attack राजस्थानची राजधानी जयपूर येथील नाहरगड जैविक उद्यानात बुधवारी सकाळी वाघाने केलेल्या हल्ल्यात एका महिला सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती दिली. मृत महिलेची ओळख नागल सुसावतान येथील रहिवासी सुगना देवी अशी झाली असून, त्या उद्यानात स्वच्छता आणि देखभालीचे काम करत होत्या.
 
 

tiger attack
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सुगना देवी वाघाच्या 16 क्रमांकाच्या बाड्यात स्वच्छता करत असताना ‘शिवाजी’ या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. आजूबाजूला उपस्थित असलेले कर्मचारी घटनास्थळी पोहोचेपर्यंत सुगना देवी यांचा मृत्यू झाला होता. प्राथमिक तपासात वाघाचे बाडे खुले असणे आणि सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्यात कथित हलगर्जीपणा झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
सामान्यतः वाघाच्या बाड्यात स्वच्छता किंवा देखभालीचे काम सुरू करण्यापूर्वी वाघाला सुरक्षित ठिकाणी बंद केले जाते. आमेरचे ठाणाधिकारी राजेंद्र गोदारा यांनी सांगितले की, सुगना देवी बाड्यात कशा प्रकारे पोहोचल्या आणि त्यावेळी सुरक्षा नियमांचे पालन झाले होते की नाही, याचा पोलीस तपास करत आहेत. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बाड्याचा परिसर रिकामा करून तेथील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशातील पीलीभीत जिल्ह्यातही वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुसरी घटना समोर आली आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या या हल्ल्यात 60 वर्षीय शेतकरी मुंशी प्रसाद यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, संतप्त ग्रामस्थांनी नुकसानभरपाई आणि सुरक्षेच्या मागणीसाठी रस्ता रोखून धरला.
पोलिसांच्या माहितीनुसार, शांतिनगर गावातील रहिवासी मुंशी प्रसाद रात्री सुमारे आठच्या सुमारास आपल्या केळीच्या बागेची राखण करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात मुंशी प्रसाद गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.
बराच वेळ उलटूनही मुंशी प्रसाद घरी परतले नाहीत, त्यामुळे कुटुंबीयांनी ग्रामस्थांच्या मदतीने त्यांचा शोध सुरू केला. त्यानंतर शेतात त्यांचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यांनी मृतदेह रामनगर तिराह्यावर ठेवून रस्ता रोखून धरला. मृताच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई द्यावी तसेच वन्यजीवांच्या हल्ल्यांपासून ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी पुरेशी व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली.
ग्रामस्थांचा आरोप आहे की, tiger attack परिसरात अनेकदा वाघ आणि बिबट्यांचे दर्शन होते. याबाबत वन विभागाला अनेक वेळा माहिती देण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही निगराणी आणि सुरक्षेसाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे वन्यजीवांच्या वाढत्या वावरामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.