आशिमा मित्तल कोण आहेत? IIT टॉपर ते IAS अधिकारी

जरांगे पाटलांशी चर्चेमुळे पुन्हा चर्चेत आलेल्या महिला अधिकाऱ्याची कहाणी

    दिनांक :02-Sep-2026
Total Views |
जालना
ashima mittal मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी येथे आंदोलन सुरू केले असून, आज त्यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे. जरांगे यांनी आंदोलन मागे घ्यावे, यासाठी सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. सुरुवातीला मंत्र्यांना आंदोलनस्थळी पाठवून जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे आता या चर्चेत एका नव्या चेहऱ्याची एन्ट्री झाली आहे. जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल या स्वतः आंतरवाली सराटीत पोहोचल्या असून, त्या जरांगे यांच्याशी चर्चा करत आहेत.
 

who is ashima mittal? iit topper and upsc ranker now negotiating with manoj jarange patil 
पहिल्यांदाच एखाद्या जिल्हाधिकाऱ्यांकडून जरांगे यांच्याशी थेट संवाद साधला जात असल्याने या चर्चेतून काही तोडगा निघतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या आंदोलनामुळे आशिमा मित्तल याही चर्चेत आल्या आहेत. मात्र, जरांगे यांच्याशी चर्चा करणाऱ्या या महिला अधिकारी नेमक्या कोण आहेत, त्यांचा प्रशासकीय प्रवास कसा राहिला आहे आणि IAS होण्यामागची त्यांची कहाणी काय आहे, हे जाणून घेणेही महत्त्वाचे ठरते.
चर्चेसाठी पहिल्यांदाच महिला अधिकारी
मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घ्यावे, यासाठी जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल स्वतः आंदोलनस्थळी दाखल झाल्या. त्यांनी जरांगे यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी जरांगे यांनी आशिमा मित्तल यांना हा प्रश्न त्यांच्या पातळीवरचा नसल्याचे स्पष्ट केले.
‘हे तुमचं काम नाहीये. तुम्ही शिकून पुढे आलेले लोक आहात. सरकारमधील चौथी शिकलेले मंत्री उगाच तुम्हाला पुढे करत आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्नच तुमच्या स्तरावरचा नाहीये. हा राज्यस्तरावरचा प्रश्न आहे. तुमच्याकडून काहीच होणार नाही,’ असे जरांगे यांनी आशिमा मित्तल यांना सांगितले.
त्यावर आशिमा मित्तल यांनी, ‘मनोजजी, नोकरी करत असताना फाशी घेण्याची वेळ आली तरी माझी तयारी आहे,’ असे उत्तर दिले. दरम्यान, आशिमा मित्तल आणि जरांगे पाटील यांच्यात चर्चा सुरूच असून, या चर्चेतून काही तोडगा निघतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
 
कोण आहेत आशिमा मित्तल?
आशिमा मित्तल या मूळच्या राजस्थानमधील जयपूरच्या आहेत. यूपीएससी परीक्षेत त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवले. २०१८च्या यूपीएससी परीक्षेत त्यांनी देशात १२वी रँक मिळवली. विशेष म्हणजे, त्या मुंबई आयआयटीच्या टॉपर होत्या. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना गोल्ड मेडलही मिळाले होते.
मुंबई आयआयटीमधून सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर आशिमा मित्तल यांनी एका मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी सुरू केली. मात्र, या नोकरीत त्यांचे मन रमले नाही. आपण केवळ या नोकरीसाठी जन्माला आलेलो नाही, अशी भावना त्यांना सतत होत होती. नोकरीतून पैसा मिळत असला तरी मनःशांती मिळत नव्हती. त्यामुळे आयएएस अधिकारी होण्याची त्यांची इच्छा अधिकच प्रबळ झाली आणि त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.
नोकरी सोडल्यानंतर त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली. यापूर्वी प्रत्येक क्षेत्रात यश मिळाल्याने यावेळीही यश मिळेल, असा विश्वास त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना होता. मात्र, पहिल्याच प्रयत्नात त्यांना यूपीएससीत यश मिळाले नाही. त्यामुळे त्यांना नैराश्याचा सामना करावा लागला. या काळातून सावरण्यासाठी त्यांनी आपल्या आवडत्या छंदांना वेळ देण्यास सुरुवात केली.
 
 
झोपडपट्टीतील त्या मुलाने बदलले आयुष्य
आशिमा मित्तल यांनी मानववंशशास्त्राचाही अभ्यास केला आहे. दिल्लीत मानववंशशास्त्राची पदवी घेत असताना प्रोजेक्टच्या निमित्ताने त्या अनेकदा झोपडपट्टी भागात जात असत. याच काळात त्यांची एका महिलेशी भेट झाली. त्या महिलेचा मुलगा हालचालही करू शकत नव्हता. आपल्या मुलाची प्रकृती नेमकी कशामुळे बिघडली, याची माहिती त्या महिलेलाही नव्हती.
ही परिस्थिती पाहून आशिमा मित्तल यांनी त्या मुलाला रुग्णालयात नेले आणि त्याच्यावर उपचार करून घेतले. या घटनेचा त्यांच्या मनावर मोठा परिणाम झाला. गरजू लोकांच्या मदतीला धावून जाता यावे आणि त्यांच्यासाठी काही करता यावे, यासाठी आयुष्यात मोठे व्हायचे, असा निर्धार त्यांनी याच वेळी मनाशी केला.यानंतर त्यांनी पुन्हा एकदा यूपीएससीची तयारी सुरू केली. विशेष म्हणजे, दुसऱ्यांदा दिलेल्या यूपीएससी परीक्षेत म्हणजेच २०१६मध्ये त्यांना यश मिळाले. त्यांना ३२८वी रँक मिळाली आणि आयआरएस (आयटी) सेवा मिळाली. मात्र, आशिमा यांना ही सेवा फारशी पसंत नव्हती. तरीही त्यांनी आयआरएस सेवा स्वीकारली आणि त्याचवेळी पुन्हा यूपीएससीची तयारी सुरू ठेवली.
तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी यूपीएससीची परीक्षा दिली. तीन वेळा प्रिलिम्स, तीन वेळा मेन्स आणि तीन वेळा मुलाखत असा प्रदीर्घ प्रवास केल्यानंतर अखेर त्यांच्या मेहनतीला घवघवीत यश मिळाले. २०१८मध्ये त्यांनी यूपीएससी परीक्षेत देशात १२वी रँक मिळवली. त्यानंतर त्यांची नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली.
आज याच आशिमा मित्तल जालन्याच्या जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत आहेत आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्याशी थेट चर्चा करत आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीबरोबरच सध्या त्यांच्या या भूमिकेचीही राज्यभर चर्चा होत आहे.