वर्धा,
senior-citizens महाराष्ट्रातील ६० वर्षांवरील सर्वधर्मीय ज्येष्ठ नागरिकांना पवित्र स्थळांचे मोफत दर्शन घडविण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना लागू केली आहे. २०२४ मध्ये योजना सुरू झाली असली तरी जिल्ह्यात आतापर्यंत केवळ तीनच यात्रा निघाल्या आहेत. याचा एकूण १ हजार २३ ज्येष्ठांनी लाभ घेतला आहे. जिल्ह्यातील समाजकल्याण विभागातर्फे ही तीर्थयात्रा आयोजित करण्यात येते. नागपूर रेल्वे विभागातून एका राज्यातील किंवा देशातील तीर्थस्थळी पाठविण्यात येते. एका ट्रेनची क्षमता ८०० प्रवाशांची आहे. नागपूर विभागात ६ जिल्हे येतात.
त्यामुळे जिल्ह्यास १५० जणांची निवड करण्यात येते. जिल्ह्यात पहिली तीर्थदर्शन यात्रा ५ ते ९ फेब्रुवारी २०२४ दरम्यान महाबोथी मंदिर, बोधगया (बिहार) येथे नेण्यात आली. यात १२० लाभार्थी होते. दुसरी यात्रा अयोध्या मंदिर येथे १८ ते २२ एप्रिल २०२५ दरम्यान नेण्यात आली. या तीर्थयात्रेकरिता जिल्ह्यातून स्पेशल ट्रेन उपलब्ध करण्यात आली होती. यामुळे या तीर्थयात्रेचा ७५६ जणांना लाभ मिळाला. तिसरी यात्रा पुन्हा महाबोधी मंदिर बोधगया येथे ११ ते १७ जुलै २०२६ दरम्यान, आयोजित करुन यात १४७ जण सहभागी झाले होते.
या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना प्रवास, भोजन, निवास आणि वैद्यकीय सुविधा मोफत दिल्या जातात. प्रवासाठी आयआरसीटीसी आणि अधिकृत ट्रॅव्हल्स कंपन्यांमार्फत रेल्वे व बसची व्यवस्था केली जाते. प्रत्येक लाभार्थीमागे शासन ३० हजार रुपयांपर्यंत खर्च करते. याजनेत एकूण १३९ तीर्थक्षेत्र निश्चित करण्यात आली आहेत. यात अयोध्या राम मंदिर, वैष्णदेवी, अमरनाथ, सुवर्ण मंदिर, जगन्नाथ पुरी, तिरुपती, काशी विश्वनाथ, बोधगया, रामेश्वरम, द्वारका यासह राज्यातील शिर्डी, पंढरपूर, माहूर, कोल्हापूर, सिद्धिविनायक, चैत्यभूमी, तुळजापूर, माहूर, दीक्षाभूमी, नागपूर, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर या तीर्थस्थळांचा समावेश आहे.
अनेकांची काही तीर्थस्थळांना भेटी देऊन दर्शन घेण्याची इच्छा असते. रुपयांअभावी अनेकांना हे शय होत नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या वतीने ही योजना सुरू करण्यात आली. लवकरच अयोध्येकरिता तीर्थयात्रा निघणार आहे. अजून आदेश आले नसले तरी, लवकरच येण्याची शयता आहे. नोंदणी सुरू होताच पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करून लाभ घ्यावा, असे समाज कल्याण विभागाचे सहायक आयुत अंकेश केदार यांनी सांगितले.